आचारसंहितेमुळे मुंबई शहर बॅनरमुक्त...; १७ दिवसांत हटविले, ८ हजारांहून अधिक बॅनर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:58 IST2026-01-02T13:58:23+5:302026-01-02T13:58:57+5:30
आचारसंहितेदरम्यान निवडणुकीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रभाव टाळण्यासाठी प्रशासनाने वेळेत प्रतिबंधात्मक उपाय राबविले जात आहेत.

आचारसंहितेमुळे मुंबई शहर बॅनरमुक्त...; १७ दिवसांत हटविले, ८ हजारांहून अधिक बॅनर्स
मुंबई : मुंबईत निवडणुकीची आचारसंहिता लागू असून १७ दिवसांत ८ हजारांहून अधिक पोस्टर बॅनर्स महापालिकेने हटविले आहेत. यात जाहिरात फलक, बॅनर्स, किऑस्क, स्टिकर्स, होर्डिंग, चिन्हे, ध्वज, फलकांसह भिंतीवरील राजकीय जाहिरातींचा समावेश आहे. ही कारवाई पालिकेच्या अनुज्ञप्ती विभागामार्फत युद्धपातळीवर सुरू असून आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर यापुढेही सुरूच राहणार आहे.
महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त पालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू केली आहे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि समतोल राखण्यासाठी आचारसंहितेची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आहे.
आचारसंहितेदरम्यान निवडणुकीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रभाव टाळण्यासाठी प्रशासनाने वेळेत प्रतिबंधात्मक उपाय राबविले जात आहेत.
याचाच एक भाग म्हणून आचारसंहितेदरम्यान मुंबई पालिका क्षेत्रात कुठेही राजकीय स्वरूपाचे जाहिरात फलक, होर्डिंग किंवा फ्लेक्स राहू नयेत यासाठी कारवाई सुरू केली असून ही मोहीम सुरूच आहे.
शहराच्या विद्रुपीकरणात वाढ
सर्वाधिक बॅनरबाजी सार्वजनिक जागेत करण्यात येत असून १५ डिसेंबरपासून १ जानेवारीपर्यंत पालिकेने येथील साडेसात हजार बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे, होर्डिंग हटवले आहेत.
हटवलेल्या साहित्यात ४,८७३ बॅनर्स,
१, १२८ झेंडे, ६९८ कटआउट्स व होर्डिंग, ९२५ पोस्टर्स, २७ भित्तीपत्रके यांचा समावेश आहे. सार्वजनिक जागेवर कोणाचीही अधिकृत परवानगी न घेता सर्रास होर्डिंग व बॅनरबाजी केली जात असल्याने मुंबई शहराचे मोठ्या प्रमाणावर विद्रुपीकरण वाढत आहे.