मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बनं उडवून देऊ, अशा धमकीचा फोन आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. या फोननंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि विमानतळ परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. पोलीस आणि बॉम्ब शोध पथकांनी परिसरात शोध घेतला असता त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. याप्रकरणी एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे. महिन्याभरात मुंबई विमानतळावर बॉम्ब असल्याची अफवा पसरवण्याची ही दुसरी वेळ आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजता एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा फोन करून पोलीस नियंत्रण कक्षाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी जलदगतीने कारवाई करत अवघ्या तासाभरात आरोपीला अटक केली. मनजीत कुमार गौतम (वय, ३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे आहे. गौतम हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. परंतु, सध्या तो मुंबईतील साकीनाका परिसरात वास्तव्यास आहे, असे फ्री प्रेस जर्नलने वृत्त दिले आहे.
वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली. मुंबई विमानतळावर सीआयएसएफ आणि मुंबई पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आले. प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. 'नागरिकांना घाबरू नका, तर सतर्क राहा आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी', असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले.