Join us  

Chartered Plane Crashed In Mumbai : घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 1:34 PM

घाटकोपरमध्ये सर्वोदय रुग्णालयात परिसरात चार्टर्ड विमान कोसळले आहे. विमान कोसळल्यानंतर स्फोटाचा आवाज झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली.

मुंबई - घाटकोपरमध्ये सर्वोदय रुग्णालयात परिसरात चार्टर्ड विमान कोसळले आहे. विमान कोसळल्यानंतर स्फोटाचा आवाज झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशामक दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विमान कोसळलं त्यावेळी वैमानिकासह 4 जण विमानात होते.  पायलट आणि 3 तंत्रज्ञ असे एकूण चार जण होते. यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. विमानातील या चौघांचा आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर लवकुश कुमार (वय 21 वर्ष), प्रशांत महाकाल (वय 23 वर्ष)व नरेश कुमार निशाद (वय 24 वर्ष) हे तीन तरुण जखमी झाले आहेत. या तिघांचीही प्रकृती स्थिर आहे.

अपघातग्रस्त विमान उत्तर प्रदेश सरकारचे होते. या विमानाला अलाहाबादमध्ये 2013 मध्ये अपघात झाला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने या विमानाची 2014 मध्ये मुंबईतील यूव्हाय एव्हिएशनकडे विक्री केली होती. या कंपनीने अलाहाबादमधील अपघातामुळे विमानाला झालेला बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर हे विमान उड्डाणासाठी पूर्णत: सज्ज आहे का? हे तपासण्यासाठी आजची चाचणी घेण्यात येत होती. त्याच वेळी ही दुर्घटना घडली.  

घाटकोपर पश्चिम परिसरात जागृती पार्क परिसरात जीवदया लेनमध्ये बांधकाम सुरू असलेल्या परिसरात हे चार्टर्ड विमान कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त समोर आले आहे. पोलीस प्रशासन, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. येथून विमानतळ जवळ असून लहान हेलिकॉप्टरचं प्रशिक्षण देण्यासाठी हा मार्ग वापरला जातो. तसंच चार्टर्ड विमानांचाही हा मार्ग असल्याची माहिती आहे. घाटकोपरमधील सर्वोदय रुग्णालयाजवळील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरू असलेल्या  इमारतीत हे विमान कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.  

(Chartered Plane Crashed In Mumbai: वैमानिकाच्या शौर्याला सलाम, प्रसंगावधान दाखवत वाचवले हजारोंचे प्राण)

दरम्यान, महिला वैमानिकाच्या प्रसंगावधानानं हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं समजल्यानंतर वैमानिकानं प्रसंगावधान दाखवत गर्दीच्या ठिकाणावरून विमान जागृती इमारतीच्या बाजूला बांधकाम सुरू असलेल्या मोकळ्या ठिकाणी वळवलं आणि तिथेच ते लँडिंग करत असताना कोसळलं. गजबलेल्या भागात इतरत्र कोठेही विमान कोसळले असते तर मोठी जीवितहानी झाली असती. मात्र, महिला वैमानिक मारिया यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.  

दुर्घटनास्थळी पोलिसांच्या तपास पथकास अपघातग्रस्त  चार्टर्ड विमानात बसविलेला 'ब्लॅक बॉक्स' सापडला आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याचे अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफचे जवानांचे मदतकार्य सुरु आहे. मात्र, या अपघातामागील कारण हे 'ब्लॅक बॉक्स' हे उपकरण उलगडणार आहे. कारण हे उपकरण अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि अपघातग्रस्त विमानाचे ठिकाण ट्रेस करण्यास मदत करतं. हा बॉक्स भगव्या रंगाचा असतो. जेणेकरून अपघातस्थळी भडक रंग पटकन तपास पथकास आढळून येतो. या बॉक्सचे एफडीआर (फ्लाईट डेटा रेकॉर्टर) आणि सीवीआर (कॉकपिट व्हॉइस रेकॉर्टर) हे दोन प्रमुख घटक आहेत.  एफडीआरद्वारे अपघाताआधी २५ तासांचा  तपशील मिळतो. तर  सीवीआरद्वारे अपघातापूर्व २ तासांचा तपशील मिळतो. हे उपकरण  आंतरराष्ट्रीय नियमानुसार इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या देखरेखीखाली विमानात बसविले जाते. विमानाच्या मागील बाजूस हा ब्लॅक बॉक्स बसविला जातो. 

  

 

टॅग्स :मुंबई विमान दुर्घटनाविमानघाटकोपर