Join us  

मुंबई सेंट्रल स्थानकात खाद्यपदार्थ ठेवतात कचऱ्याच्या डब्याजवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 2:31 AM

‘ईट राइट’ स्थानकाचा बोजवारा

मुंबई : अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) पश्चिम रेल्वेवरीलमुंबई सेंट्रल हे देशातील पहिले ‘ईट राइट स्थानक’ म्हणून घोषित केले आहे. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेचे पालन, पौष्टिक आहाराची उपलब्धता, अन्नपदार्थ तयार करताना योग्य हाताळणी, कचरा व्यवस्थापन अशा विविध पातळ्यांवर ‘ईट राइट’ (खाण्यासाठी योग्य) स्थानकाचा मान मुंबई सेंट्रलला मिळाला आहे. याबाबत मुंबई सेंट्रल स्थानक हे खरेच ईट राइट आहे का, याचा ‘लोकमत’ने आढवा घेतला.

मात्र, येथील परिस्थिती पाहिल्यानंतर आणि प्रवाशांशी संवाद साधल्यानंतर ‘ईट राइट स्थानक’ संकल्पना चांगली, पण जनजागृतीचा अभाव असल्याचे निदर्शनास आले.धक्कादायक बाब म्हणजे या स्थानकात खाद्यपदार्थ कचऱ्याचा डब्याजवळ ठेवले जातात़ त्यामुळे या योजनेचा चांगलचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. प्रवाशांच्या आरोग्यालाही हानिकारक आहे.

प्रवाशांनो, बिल मागा

बिल नाही तर शुल्क नाही, असा मजकूर छापलेली पाटी प्रत्येक स्टॉलवर दिसून आली, परंतु खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर पदार्थांची खरेदी करताना कोणताही प्रवासी बिल मागत नव्हता, तसेच विक्रेतेही प्रवाशांना स्वत:हून बिल देत नव्हते.

आवश्यक त्या वस्तुची उपलब्धता

रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ प्रामुख्याने विक्रीसाठी ठेवले जातात, तसेच बुक स्टॉलही असतात. मुंबई सेंट्रल स्थानकावर खाण्या-पिण्याच्या पदार्थाव्यतिरिक्त प्राथमिक औषधोपचाराचे साहित्य, मोबाइल कव्हर, चार्जर इत्यादी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबई सेंट्रलचे स्वच्छ फलाट

मुंबई सेंट्रल स्थानकाचे फलाट क्रमांक एक आणि दोन स्वच्छ ठेवण्यात आले होते, तसेच फलाटावरील कचराकुंड्याही चांगल्या स्थितीमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. काही कालावधीनंतर स्वच्छता कर्मचारी फलाटावरून फेरफटका मारून कचरा पडला आहे का, याची पाहणी करतानाही दिसून आले, तसेच तीन व चार फलाटही स्वच्छ दिसून आले.

खाद्यपदार्थांवर क्यूआर कोड दिसेना

खाद्यपदार्थांची गुणवत्ता क्यूआर कोडद्वारे खाद्यपदार्थाचा दर्जा आणि पदार्थ बनविल्याची तारीख इत्यादी माहिती प्रवाशांना मिळण्यासाठी प्रत्येक खाद्यपदार्थांच्या पाकिटावर क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. मात्र, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर फक्त पिण्याच्या बाटल्यांवर क्यूआर कोड दिसून आला, पण खाद्यपदार्थांवर दिसला नाही. त्याचप्रमाणे, फलाटावरील खाद्यपदार्थ विक्रेत्याला क्यूआर कोडबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे चौकशीदरम्यान समजून आले.

खाद्यपदार्थ बनविणाऱ्या स्वयंपाक्यांचे कपडे मळके

रेल्वे फलाटावरील स्टॉलवर जास्त खाद्यपदार्थांची विक्री होते. या वेळी खाद्यपदार्थ बनविणारे स्वयंपाकी यांच्या कपड्यांबाबत स्वच्छता दिसून आली नाही, तसेच खाद्यपदार्थ कचऱ्याचा डब्याजवळ ठेवलेले दिसून आले. मुंबई सेंट्रल हे ईट राइट स्थानक जरी घोषित झाले असले, तरी याची जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. अद्यापही ईट राइटची संपूर्ण माहिती स्टॉलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अवगत झालेली नाही. पश्चिम रेल्वेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा ईट राइटचा दर्जा काही दिवसांनी खालावेल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :भारतीय रेल्वेरेल्वेमुंबईमहाराष्ट्र सरकारपीयुष गोयल