महेश कोले लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल आगारामध्ये स्वच्छतेचे वावडे कायम आहे. याठिकाणी मातीचे ढीग आणि दारूच्या बाटल्यांचा खच पडला असून, वर्कशॉपजवळ पाणी साचले आहे. त्याकडे डेपो मॅनेजरचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक कर्मचारी आजारी पडले आहेत. त्याचा परिणाम प्रवाशांच्या आरोग्यावरही होत असल्याचे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मुंबई सेंट्रल डेपोमध्ये ड्रेनेजच काम करण्यासाठी महामंडळाकडून जानेवारीत ३३ लाखांची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार या ठिकाणी ड्रेनेजचे काम करण्यात आले आहे. परंतु, नव्याने बांधलेल्या ड्रेनेजचे मॅनहोल गरजेपेक्षा उंच असून, त्यामध्ये पाणी जात नाही. तर जुने ड्रेनेजचे मॅनहोल तुडुंब भरल्याचे चित्र आहे. परिणामी, याठिकाणी पाण्याचा योग्य निचरा होत नाही. त्यामुळे डासांची उत्पत्तीची वाढली असून, अनेक कर्मचारी आजारी पाडले आहेत. कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, अनेकदा तक्रारी करून देखील याकडे डेपो मॅनेजर लक्ष देत नाहीत. उलट त्यांनाच तुम्ही आजारी कसे पडत असे उलट प्रश्न विचारले जातात. दरम्यान, जानेवारीमध्ये राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान नेमकी कशासाठी होते, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे. मुख्य प्रवेशद्वारावर जुने फर्निचर, गाद्या मुंबई सेंट्रल डेपोच्या मुख्य प्रवेशद्वारावर सिमेंट, विटा, राडोराड्याच्या गोळ्या, तर मुख्यालयाच्या प्रवेशद्वार शेजारी जुने फर्निचर, गाद्या, माती पडून आहे. या सर्व गोष्टी अनेक महिन्यांपासून या ठिकाणी असल्याचे तिथे उपस्थित सुरक्षा रक्षकाने सांगितले.
केवळ फोटो छापलेल्या ठिकाणी स्वच्छता‘मुंबई सेंट्रल डेपोला अवकळा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १८ जुलैला बातमी प्रसिद्ध केली होती. या वृत्ताने डेपोमधील कचरा कुंडीतील कचरा ओसंडून वाहत असल्याचे फोटो प्रसिद्ध केले होते. याची तत्काळ दाखल घेऊन केवळ तेवढाच परिसर स्वच्छ करण्यात आला. मात्र, इतरत्र घाण तशीच आहे.
मद्यपींचा अड्डा डेपोमध्ये असलेल्या भांडार गृहाशेजारी प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळाला. तर, बस पार्किंगच्या ठिकाणी अनेक दारूच्या बाटल्या असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी रोज ३० ते ३५ बाटल्या सापडत असल्याचे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे एसटीचे चालक-वाहक आणि कर्मचारीच मद्यपान करतात का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.मुख्यालयातच ‘अंधार’ मुंबई सेंट्रल आगार हे एसटीचे मुख्यालय आहे. येथे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष माधव कुसेकर आणि परिवहन मंत्री तथा एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांचे कार्यालय आहे. त्यामुळे याकडे त्यांचे लक्ष जात नाही का, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.