मागच्या काही काळापासून ऑनलाइन तसेच इतर माध्यमातून लोकांना गंडा घालणाऱ्यांना पेव फुटले आहे. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. येथे एका सरकारी विमा कंपनीच्या कॅशियरला एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहाराचं आमिष दाखवून १० लाखांहून अधिक रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
एका अधिकाऱ्याने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, एका सरकारी विमा कंपनीच्या चर्चगेट येथील शाखेत काम करणाऱ्या कॅशियरला काही ठकांनी एक रुपयाच्या नोटीच्या बदल्यात मोठं बक्षीस देण्याचं आमिष दाखवलं आणि त्याच्याकडून तब्बल १०.३८ लाख रुपये उकळले.
या अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईतील सांताक्रूझ पश्चिम येथील एका व्यक्तीने या संदर्भात पश्चिम विभागातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार करणाऱ्या या व्यक्तीने या तक्रारीमध्ये सांगितले की, २३ फेब्रुवारी सोशल मीडियावर रील बघत असताना माझी नजर एका जाहीरातीवर पडली. या जाहीरातीमध्ये एक रुपयाची नोट देणाऱ्याला ४ लाख ५३ हजार रुपयांचं बक्षीस देण्याचं आश्वासन दिलं गेलंय. त्यामध्ये एक व्हॉट्सअॅप नंबरही देण्यात आला होता. दरम्यान, मी त्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर एक रुपयाच्या नोटेचा फोटो पाठवला. त्यानंतर मला पंकज सिंह नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर पंकज सिंह याने सांगितले की, तो नाण्यांच्या एका दुकानात काम करतो. फोन करणाऱ्या या व्यक्तीने मला एक फॉर्म भरण्यास सांगितले. तसेच नोंदणीसाठी ६ हजार १६० रुपये जमा करण्यास सांगितले, असे फसवणूक झालेल्या व्यक्तीने सांगितले.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, काही वेळाने सदर व्यक्तीने पीडित तक्रारदाराला पुन्हा फोन केला. तसेच आधी सांगितलेली रक्कम चुकीची असून, ६ हजार १०७ रुपये पुन्हा जमा करावे लागतील. त्यानंतर आधी जमा केलेली रक्कम परत केली जाईल, असे सांगितले. त्यानंतर पंकज सिंह याने तक्रारदाराची भेट एका अन्य व्यक्तीशी घालून दिली. या व्यक्तीने आपली ओळख अरुण शर्मा अशी करून दिली. त्यानंतर अरुण शर्मा याने तक्रारदार कॅशियरला एक रुपयाच्या नोटेच्या बदल्यात बक्षीस जिंकल्याचे रिझर्व्ह बँकेचे एक पत्र पाठवले. तसेच या दोघांनीही या कॅशियरला बोलण्यात गुंतवून ठेवले. तसेच विविध कारणं देऊन त्याच्याकडून १०.३८ लाख रुपये उकळले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींनी जर ६ लाख रुपये आणखी जमा केले तर बक्षीसाची रक्कम २५ लाख ५६ हजार होईल, असे सांगितल्यावर पीडित कॅशियरला आपली फसवणूक होत असल्याचा संशय आला. त्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली. या प्रकरणी आयटी अॅक्ट आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.