Join us

परळच्या फ्लॅटमध्ये व्यापाऱ्याला केलं 'टॉर्चर'; जुन्या वादातून अपहरण करुन ७६ लाखांची वसूली, महिलेचाही सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:01 IST

मुंबईत एका व्यापाऱ्याचे अपहरण करुन लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Mumbai Crime: मुंबईत एका व्यावसायिकाचे भर रस्त्यातून अपहरण करून त्याला धमकावल्याची आणि लाखोंचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुन्या सोन्याच्या व्यवहाराच्या वादातून हा भयानक प्रकार घडला. आरोपींनी व्यापाऱ्याला बंधक बनवून त्याच्याकडून अंदाजे ७६.२३ लाख रुपये किमतीचे ५९१ ग्रॅम सोने जबरदस्तीने उकळले. व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सहा जणांना  अटक केली ज्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

१४ ऑक्टोबरच्या रात्री हा सगळा प्रकार घडला. व्यापारी आपल्या घराबाहेर उभा असतानाच, एक कार त्याच्याजवळ येऊन थांबली. त्यातून तीन पुरुष आणि एक महिला खाली उतरले. त्यांनी व्यापाऱ्याला बळजबरीने कारमध्ये बसवले आणि परळ येथील एका फ्लॅटमध्ये नेऊन डांबून ठेवले. परळच्या फ्लॅटमध्ये आरोपींनी व्यापाऱ्याला जुन्या सोन्याच्या देवाणघेवाणीच्या वादावरून बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर त्यांनी व्यापाऱ्याकडील ७६ लाखांहून अधिक किमतीचे ५९१ ग्रॅम सोने लुटले. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी व्यापाऱ्याकडून २.९९ लाख रुपयांचा चेक आणि १५ हजार रुपये यूपीआयद्वारे ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर त्यांनी व्यापाऱ्याला सोडून दिले.

या भयानक अनुभवानंतर पीडित व्यापाऱ्याने तत्काळ एलटी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत, अवघ्या काही तासांतच कारवाई करत सहा आरोपींना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये तरक मैती (३५), रघुनाथ मैती (३४) (दोघेही नवी मुंबईतील सोनार) तसेच दीपक महाडिक (४५), त्यांची पत्नी अलका महाडिक (३५), राहुल दिवे (३०) आणि सुनील गोरई (२८) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींवर अपहरण, धमकावणे आणि जबरन वसूली (खंडणी) अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना १८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी व्यापाऱ्याकडून लुटलेले सोने आणि अन्य साहित्य  जप्त केले आहे.

एलटी मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार जुन्या सोन्याच्या व्यवहाराच्या वादातून झाला आहे. पोलिसांनी या टोळीने यापूर्वीही असे गुन्हे केले आहेत का, या दिशेने तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Businessman Tortured, Kidnapped for Ransom Over Old Gold Dispute

Web Summary : A Mumbai businessman was kidnapped and tortured over a gold dispute. The victim was robbed of gold worth ₹76.23 lakhs. Police arrested six people, including a woman, recovering the stolen valuables. The group faces charges of kidnapping and extortion.
टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस