Join us

'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 11:22 IST

मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून एका व्यापऱ्याने आपले आयुष्य संपवले. ही घटना मध्यरात्री घडली आहे.

मुंबईच्या वांद्रे-वरळी सीलिंकवर पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यावसायिकाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या व्यावसायिकाचे नाव अमित शांतीलाल चोप्रा असे असून, ते ४७ वर्षांचे होते. अमित हे मूळचे राजस्थानचे आहेत. काही व्यावसायिक अडचणींमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अमित शांतीलाल चोप्रा मंगळवारी मध्यरात्री टॅक्सीने प्रवास करत होते. त्यांची टॅक्सी वांद्रे-वरळी सी लिंकवर पोहोचताच, त्यांनी विचित्र वागायला सुरुवात केली. आधी त्यांनी सापासारखा फुसफुस आवाज काढला आणि नंतर साप चावला असे म्हणत ओरडायला सुरुवात केली.  यामुळे टॅक्सी चालक घाबरला आणि त्याने गाडी थांबवली. त्यानंतर अमित चोप्रा यांनी टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि सी लिंकवरून समुद्रात उडी मारली. घडलेली घटना पाहून भेदरलेल्या टॅक्सी चालकाने ताबडतोब सी लिंक कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना कळवले.

घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृताजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. कुटुंबाला घटनेची माहिती देण्यात आली आहे. माहिती मिळताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे आता पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

टॅक्सीमध्ये विचित्र वागायला सुरुवात केली अन्.. मृत व्यक्ती हा इमिटेशन ज्वेलरीजचा व्यवसाय करणारा होता. तो त्याच्या पत्नी आणि मुलांसह अंधेरी पश्चिम, मुंबई येथे राहत होता. तो मुंबईत इमिटेशन ज्वेलरीजचा व्यवसाय करत होता. मंगळवारी रात्री १ वाजता चोप्रा टॅक्सीने निघाला. टॅक्सी वांद्रे मार्गे सी लिंकवर पोहोचली. यादरम्यान तो विचित्र वागू लागला आणि सापासारखा फुसफुस आवाज करू लागला. यानंतर त्याने साप चावला म्हणून ओरडायला सुरुवात केली. यामुळे टॅक्सी चालक घाबरला आणि त्याने गाडी थांबवली. तो गाडीतून उतरला आणि त्याने समुद्रात उडी मारली.

पोलिसांचा तपास सुरू पोलिसांनी चोप्रा यांच्या आत्महत्येचा तपास सुरू केला आहे. येत्या काही दिवसांत त्यांच्या नातेवाईकांची आणि मुलांची चौकशी केली जाईल. चोप्रा आर्थिक अडचणीत होते का? त्यांना इतर काही समस्या होत्या का? या प्रश्नांची उत्तरे शोधून आत्महत्येमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.  

टॅग्स :वांद्रे-वरळी सी लिंकमुंबईगुन्हेगारी