Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आज बाहेर आहे, उद्या तुझ्या छातीत असेल"; बिल्डरला जिवंत काडतूस पाठवून छोटा शकीलच्या नावाने धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 14:33 IST

मुंबईत छोटा शकिलच्या नावाखाली एका बिल्डरला धमकवण्यात आलं आहे.

Mumbai Builder Receives Death Threat:मुंबईत अंडरवर्ल्डच्या हालचाली पुन्हा सुरु झाल्या असून एका घटनेने खळबळ उडाली आहे. अंडरवर्ल्डच्या नावावरुन अंधेरीतील वर्सोवा भागात एका प्रसिद्ध बिल्डरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, बिल्डरच्या कारच्या नंबर प्लेटजवळ एक पाकीट लपवून ठेवण्यात आले होते, ज्यामध्ये एक जिवंत काडतूस आणि छोटा शकीलच्या नावाने धमकीचे पत्र आढळले.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ मार्च २०२६ रोजी बिल्डर मेहुल मेहता हे वांद्रे येथील आपल्या निवासस्थानावरून अंधेरीतील वर्सोवा मेट्रो स्टेशनजवळील त्यांच्या एका कंस्ट्रक्शन साईटवर आले होते. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास जेव्हा त्यांचा अंगरक्षक वैभव बावलकर हा गाडीतून भेटवस्तू आणण्यासाठी परतला, तेव्हा चालकाने कारच्या मागच्या नंबर प्लेटजवळ काहीतरी संशयास्पद असल्याचे निदर्शनास आणून दिले.

तपासणी केली असता, नंबर प्लेट आणि डिक्कीच्या मधील जागेत एक पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक पाकीट सापडले. हे पाकीट उघडले असता त्यात मेहुल मेहता यांच्या नावाचे एक लिफाफा होता. 

"आज गोळी बाहेर आहे, उद्या तुझ्या छातीत असेल"

लिफाफ्यात हाताने लिहिलेली एक चिठ्ठी होती, ज्यामध्ये अत्यंत धमकी देण्यात आली होती. "मेहता सुधर जा, तुझे समझ में नहीं आ रहा. आज ये बाहर है, कल ये तेरे सीने के अंदर होगा. अल्लाह हाफिज – छोटा शकील," असं या पत्रात लिहिलं आहे. या चिठ्ठीसोबतच सेलोटेपने एक जिवंत काडतूस चिटकवण्यात आले होते. हे पाहून मेहता यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.

तपासाची चक्रे फिरली

या घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांचच्या अँटी एक्सटॉर्शन सेलने समांतर तपास सुरू केला आहे. वर्सोवा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आर्म्स ॲक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१(२) आणि ३५१(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या बांधकाम स्थळाच्या आसपासचे आणि वांद्रे ते वर्सोवा दरम्यानचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, जेणेकरून हे पाकीट नेमके कोणी आणि कधी ठेवले याचा शोध घेता येईल.

अंडरवर्ल्ड कनेक्शन?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहता यांना यापूर्वीही अंडरवर्ल्डशी संबंधित धमक्या आल्या आहेत. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एका मोठ्या पुनर्विकास प्रकल्पावरून ही धमकी देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानेही या घटनेची दखल घेत मेहता यांची पोलीस सुरक्षा पुन्हा बहाल करण्याचे निर्देश दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai builder threatened with bullet, Chota Shakeel's name used.

Web Summary : Mumbai builder Mehul Mehta received a death threat and a live cartridge in a package left on his car, signed by Chota Shakeel. Police are investigating the incident, suspecting underworld involvement due to a Bandra redevelopment project. Mehta has been granted police protection.
टॅग्स :गुन्हेगारीमुंबईमुंबई पोलीस