‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 08:33 IST2025-08-18T08:33:07+5:302025-08-18T08:33:39+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या, २९ ऑगस्टपर्यंत मुदत

‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कबुतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवण्याबाबत मुंबई महापालिका विचार करत आहे. याबाबत आलेल्या तीन अर्जावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत. या सूचना पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ई-मेल आयडीवर आजपासून पुढील ११ दिवस म्हणजे २९ ऑगस्टपर्यंत मुंबईकर नोंदवू शकणार आहेत.
मुंबईतील कबुतरखाने बंद करावेत की नाही यावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्यात यावे व कबुतरखाना बंद करू नये, असे आदेश राज्य सरकारने ७ ऑगस्टला महापालिकेला दिले होते. १३ ऑगस्टला उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी दादर कबुतरखान्याजवळ कबुतरांना दररोज सकाळी ६ ते ८ या कालावधीत खाद्य देण्याच्या मागणीवर विचार सुरू असल्याची माहिती महापालिकेने दिली. मात्र, महापालिकेने कोणतीही सरसकट परवानगी देण्यापूर्वी आधी त्याबाबत जाहीर सूचना काढावी आणि प्रस्तावावर हरकती-सूचना मागवाव्यात व त्यानंतरच कबुतरांना खाद्य देण्याचा निर्णय केव्हा व कसा घ्यावा याबाबत विचार करावा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आता महापालिकेने कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य घालण्याबाबत नागरिकांची मते मागवली आहेत.
अर्ज कोणी केले?
मुंबईतील कबुतरखान्यांबाबत दादर कबुतरखाना ट्रस्ट बोर्ड, यास्मिन भन्साळी अँड कंपनी आणि पल्लवी पाटील, ॲनिमल अँड बर्डस् राईटस् ॲक्टिविस्ट यांच्याकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. हे तीन ही अर्ज पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर ३ गुन्हे दाखल
न्यायालयाच्या मनाईनंतरही कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी दाणे टाकणाऱ्यांवर १ ऑगस्ट ते ११ ऑगस्टदरम्यान पालिकेकडून ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये दादरमध्ये २ तर गिरगांवमध्ये १ गुन्हा दाखल झाला आहे. या शिवाय या काळात ३२ हजारांचा दंडही करण्यात आला आहे. ही कारवाई करण्यासाठी महानगर पालिकेकडून घनकचरा विभागाच्यावतीने ठिकठिकाणी कर्मचारी नेमले आहेत.