Ashish Shelar Mumbai BMC Contractors: कंत्राटदारांनी ज्या पद्धतीने रस्त्यांच्या कामाचे नियोजन केले पाहिजे होते, ते केलेले दिसत नाही. जे कंत्राटदार काम करत नाही त्यांच्यावर मजबूत दंड लावण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत, असे मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. शेलार यांनी आज पूर्व उपनगरातील रस्तेबांधणी कामाचा पाहणी दौरा केला. त्यानंतर त्यांनी दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले.
मुंबई पूर्वच्या N वॉर्डमधील घाटकोपर येथे एमपी वैद्य मार्ग ते टिळक रोड जंक्शन या रस्त्याची पाहणी करताना असे निदर्शनास आले की, गेली ६ महिने खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पहाटे सिमेंट काँक्रिट टाकण्यात आले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केली आहे. यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर सोबत होते. ही सर्व परिस्थिती आणि नागरिकांचा रोष त्यांच्या लक्षात आणून दिला आणि तातडीने या सर्व बाबतीत सुधारणा करा, अशा सूचना मंत्री शेलार यांनी केल्या.
S वॉर्डमधील भांडूप पश्चिम येथील अशोक केदारे चौक आणि टेंभी पाडा रस्त्यांच्या कामांचीही पाहणी करण्यात आली. या ठिकाणी रस्त्यांचे काम अपूर्ण असून, केवळ अर्धे काँक्रिटीकरण झाले आहे आणि रस्त्याची लेव्हल देखील योग्य केलेली नाही, अशी गंभीर स्थिती निदर्शनास आली.स्थानिक भाजप पदाधिकारी आणि नागरिकांनी कंत्राटदाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ही बाब महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या लक्षात आणून देत याबाबत तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
यादरम्यान, माध्यमांशी बोलताना, मंत्री शेलार म्हणाले की, मुंबई उपनगरातील रस्त्यांच्या कामाच्या बाबतीत आमची जबाबदारी म्हणून आम्ही प्रत्येक गल्लोगल्ली फिरू, आमच्या भूमिका सरकारला सांगू आणि काम करुन घेऊ. आम्ही प्रशासनाला सांगितलं आहे की, आता नव्याने रस्ते खोदून ठेवू नका. जर एका बाजुचा रस्त्याचा खोदून झाला असेल तर ती आधी पूर्ण करा आणि जी दुसरी बाजू आहे, त्याची लेव्हल करा. जो रहादारीयुक्त असेल रस्ता असेल तेथे कामे वेगाने पूर्ण करा. जागरूक प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टी रस्त्यावर आपल्या प्रतिनिधींना घेऊन या कामाला लागली आहे, असेही त्यांनी सांगितले.