Join us

ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 16:21 IST

१९६६ मध्ये पक्ष स्थापनेनंतर पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला होता.

मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे जुने नाते आहे. त्यामुळे हा मेळावा शिवसेनेच्या पारंपरिक मैदानावर होणार असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. येत्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे पक्षाच्या धोरणांबाबत, विरोधकांच्या टीकेबाबत आणि महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करतील. 

बीएमसीने ही परवानगी काही अटींवर दिली आहे. त्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, स्वच्छता आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. पक्षाने या अटी मान्य केल्या असून आता दसरा मेळाव्याची तयारी जोरात सुरू करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीही उद्धवसेनेला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी मिळाली होती. मात्र महापालिका निवडणुका आणि मनसेसोबत युतीच्या चर्चेमुळे यंदाच्या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेच्या इतिहासात शिवाजी पार्क मैदानाला खूप महत्त्व आहे. याच मैदानावर शिवसेनेचा पहिला मेळावा झाला होता. बाळासाहेबांच्या काळात या मैदानावर अनेक दमदार सभांचे आयोजन झाले, ज्यात त्यांच्या आक्रमक भाषणांनी लाखो कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांमुळे शिवसेनेची ओळख 'मराठी अस्मिता' आणि 'हिंदुत्व'शी याच्याशी जोडली गेली. 

१९६६ मध्ये पक्ष स्थापनेनंतर पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून हा मेळावा पक्षाच्या नेत्यांसाठी कार्यकर्त्यांना संबोधित करण्याचे व्यासपीठ बनले आहे. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानासाठी दोन्ही गटांत संघर्ष होत आला आहे. २०२२ मध्ये शिवाजी पार्कचे प्रकरण न्यायालयात गेले होते. पहिल्यांदा अर्ज केल्याने आम्हाला मैदान मिळावे, असा उद्धवसेनेचा दावा होता. या वादात न्यायालयाने ठाकरे यांच्या बाजूने कौल दिल्यानंतर शिंदेसेनेने ‘बीकेसी’त मेळावा घेतला होता. त्यात यंदा पुन्हा उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेमुंबई महानगरपालिकाशिवसेना