Join us

Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:40 IST

Mumbai Auto Drivers Locker Service Shut Down: उत्पन्नामुळे देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील रिक्षाचालकाला अमेरिकन दूतावासाबाहेर लॉकर सेवा पुरवण्यास मनाई करण्यात आली.

उत्पन्नामुळे देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील रिक्षाचालकाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. संबधित रिक्षाचालक अमेरिकन दूतावासात मुलाखतीसाठी आलेल्या लोकांना लॉकर सेवा पुरवून महिन्याला लाखो रुपये कमावतो, अशी सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्यानंतर बीकेसी पोलिसांनी संबंधित रिक्षाचालकाला अमेरिकन दूतावासाबाहेर लॉकर सेवा पुरवण्यास मनाई केली. रिक्षाचालकाकडे लॉकर भाड्याने देण्याचा परवाना नसल्याचे कारण देत पोलिसांनी ही कारवाई केली.

अमेरिकन दूतावासाबाहेर लॉकर सेवा पुरवून एक रिक्षाचालक महिन्याला ८ लाख रुपयांची कमाई करतो, अशी माहिती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाला चौकशी बोलावून घेऊन त्याला अमेरिकन दूतावासाबाहेर लॉकर सेवा पुरवण्यास मनाई केली. रिक्षाचालकाकडे प्रवाशांची वाहतूक करण्याचा परवाना आहे, लॉकर सेवा चालवण्याचा नाही, असे बीकेसी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यानी स्पष्ट केले. या रिक्षाचालकाव्यतिरिक्त एकूण १२ जण अमेरिकन दूतावासाबाहेर लॉकर सेवा पुरवत आहेत. हे सर्वजण जवळच्या भारतनगर झोपडपट्टीतील रहिवासी आहेत, अशीही माहिती मिळाली.

लेंसकार्टचे प्रोडक्ट लीडर राहुल रुपानी यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट केली होती, त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, "मी अमेरिकन वाणिज्य दूतावासात गेलो असता मला बॅग आत नेण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे बॅग कुठे ठेवायची? असा मला प्रश्न पडला. त्यानंतर एक रिक्षाचालक माझ्याजवळ आला आणि त्याने माझी बॅग त्याच्याजवळ ठेवण्यास सांगितले, यासाठी तो एका व्यक्तीकडून १००० रुपये आकारतो आणि हा त्याचा रोजचा व्यवसाय असल्याचे त्याने म्हटले. मी रिक्षाचालकावर विश्वास ठेवून माझी बॅग त्याच्याकडे सोपवली. त्यानंतर मला कळले की, हा रिक्षाचालक प्रवाशांची वाहतूक न करता अमेरिकन दूतावासात मुलाखतीसाठी आलेल्या लोकांची बॅग सांभाळून दिवसाला २० ते ३० हजार रुपये कमावतो." मात्र, या पोस्टमुळे चर्चेत आलेल्या रिक्षाचालकाने हे नाकारले आणि तो महिन्याल फक्त २५ हजार रुपये कमावतो, असे त्याने सांगितले.

टॅग्स :सोशल व्हायरलमुंबईमुंबई पोलीसमहाराष्ट्र