Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 17:21 IST

हा प्रश्न रहिवाशांच्या दैंनदिन जीवनावर गंभीर परिणाम करणारा असून त्यावर तातडीने आणि ठोस उपाययोजना होणे आवश्यक असल्याचं मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी पत्रात म्हटलं आहे.

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईभाजपाकडून जोरदार तयारी सुरू आहे. अलीकडेच मुंबई भाजपा अध्यक्षपदाची जबाबदारी भाजपा आमदार अमित साटम यांच्यावर देण्यात आली. साटम यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर महायुतीचा महापौर बसेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. आता साटम यांच्याकडूनही पक्षातील नेते, कार्यकर्त्यांच्या बैठकीचा सिलसिला सुरू आहे. 

यातच नवनियुक्त मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी एक अभ्यास गट बनवला आहे. हा गट मुंबईतील ऑक्युपेशन सर्टिफिकेट न मिळालेल्या इमारतीतील रहिवाशांचे प्रश्न सोडवणार आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ४ सदस्यांचा हा अभ्यास गट आहे. मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांना ऑक्युपेशन सर्टिफिकेट उपलब्ध नसल्यामुळे विविध अडचणी व अडथळ्यांना सामोरे जावं लागत आहे. हा प्रश्न रहिवाशांच्या दैंनदिन जीवनावर गंभीर परिणाम करणारा असून त्यावर तातडीने आणि ठोस उपाययोजना होणे आवश्यक असल्याचं मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी पत्रात म्हटलं आहे.

त्यामुळे रहिवाशांच्या या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने सखोल अभ्यास करण्यासाठी हा अभ्यास गट बनवला आहे. हा गट या प्रश्नांवर अभ्यास करून योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी नेमण्यात आला आहे. यात गोपाळ शेट्टी यांना अध्यक्ष बनवण्यात आले आहे. त्यात वकील अमित मेहता, विवेकानंद गुप्ता, जयप्रकाश मिश्रा आणि सिद्धार्थ शर्मा यांना सदस्य बनवण्यात आले आहे. या अभ्यास गटाद्वारे संबंधित प्रश्नावर सविस्तर अभ्यास करून व्यवहार्य आणि प्रभावी उपाययोजना सुचवणारा अहवाल पक्षाला सादर करण्यात यावा अशी सूचना मुंबई भाजपा अध्यक्षांनी दिली आहे. मात्र मुंबई भाजपानं नेमलेल्या या अभ्यास गटात एकही मराठी नाव नसल्याने सोशल मीडियावर अनेक मराठी भाषिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यावर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यात महापौर भाजपाचा बनवा अशा सूचना केल्या. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. अमित शाह म्हणतात की, भाजपाचा महापौर मुंबईत होईल. याचाच अर्थ तो मराठी माणूस असणार नाही. या गोष्टीला एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. परंतु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून मुंबईवर मराठी माणसाचा भगवा फडकेल आणि मराठीच महापौर होईल असा दावा करत राऊतांनी भाजपा आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.   

टॅग्स :भाजपामुंबई