बेस्ट उपक्रमातील भाडेतत्वावरील बसचे वाहक, चालक आणि प्रशासनातील अंतर्गत वादामुळे सोमवारी सकाळपासून धारावी आणि प्रतिक्षानगर बस आगारात काम बंद आंदोलन करण्यात आले. यामुळे दोन्ही आगारातील २०० हून अधिक बसेसवर परिणाम होऊन त्याचा थेट फटका प्रवाशांना बसला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून धारावी, प्रतीक्षानगर आगारातून बस न सुटल्याने प्रवासी खोळंबून राहिले.
बेस्ट उपक्रमातील भाडेतत्वावरील कर्मचारी आणि प्रशासन यांच्यातील वादाचा फटकाही प्रवाशांना बसताना दिसून आला आहे. सोमवारच्या धारावी, प्रतिक्षानगर आगारातील आंदोलनामुळे प्रतीक्षानगर आगारात ११० बस आणि धारावी आगारात १०० बस उभ्या राहिल्याने फेऱ्यावर परिणाम झाला. तसेच मजास, मुलुंड, वडाळा, सांताक्रूझ आगारात काहिसा परिणाम झाला.
मातेश्वरी कंपनीसारख्या भाडेतत्वावरील गाड्यांच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार, सुट्ट्या आवश्यक सुविधा मिळत नाहीत. परिणामी, वेळोवेळी होणाऱ्या आंदोलनामुळे लाखो प्रवाशांना वेठीस धरण्यात येत आहे. बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना सुट्टी, रजा न घेता, जादा वेळ काम करावे. जेणेकरुन प्रवाशांना योग्य सुविधा मिळतील. प्रशासनाने स्वमालकीच्या ४ हजार बसच्या ताफा लवकरात लवकर घ्यावा. - सुहास सामंत, अध्यक्ष, बेस्ट कामगार सेना
...म्हणून आंदोलन- बेस्टच्या माहितीनुसार, मातेश्वरी बस कंपनीच्या बसवर गर्भवती महिला वाहकास कर्तव्यास पाठवण्यात आले.- मात्र, सहकाऱ्यांनी त्यांना हलके काम द्या, अशी विनंती केली होती. मातेश्वरीच्या व्यवस्थापकांनी फोन करुन गर्भवती महिला वाहकास बोलावून घेतला. गैरसमजद होऊन इतर वाहकांनी त्यांना मारहाण केली.