मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील वांद्रे तलावाजवळ कबुतरांना खाऊ घालणाऱ्या चार जणांविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. हे न्यायालयीन आदेश सार्वजनिक उपद्रव टाळण्यासाठी आणि स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी दिले आहेत, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले.
याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक उपद्रव शोधक अधिकारी योगेश फाळके यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. गुरुवारी सकाळी ११ वाजता योगेश फाळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वांद्रे तलावाजवळ मेहताब शेख, निखिल सरोज आणि सलाम दुर्गेश कुमार या तीन व्यक्तींना कबुतरांना दाणे खाऊ घालताना पाहिले.
न्यायालयाच्या आदेशानुसार ही गोष्ट करण्यास मनाई असल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई सुरू केली. त्याचवेळी एक महिला घटनास्थळी आली आणि तिनेही कबुतरांना खाऊ घालण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्यांच्याशी वाद घातला आणि दाणे खाऊ घालणे सुरूच ठेवले. नंतर ती तिथून निघून गेली, पण अधिकाऱ्यांनी तिच्या गाडीचा क्रमांक नोंदवून घेतला.
यानंतर, बीएमसी अधिकाऱ्यांनी मेहताब, निखिल आणि सलाम यांना वांद्रे पोलिस ठाण्यात आणले आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहितेच्या कलम २७०, २७१, २२३ आणि २२१ अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.