मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात ३ रुपयांची वाढ होणार असल्याची घोषणा खुद्द राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून नवे दर लागू होणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं आहे.
मुंबईत सध्या रिक्षाचं किमान भाडं २३ रुपये तर टॅक्सीचं किमान भाडं २८ रुपये इतकं आहे. त्यात तीन रुपयांची वाढ झाल्यामुळे १ फेब्रुवारीपासून रिक्षाचं किमान भाडं हे २६ रुपये तर टॅक्सीच्या किमान भाड्यासाठी मुंबईकरांना ३१ रुपये मोजावे लागणार आहेत. हेही वाचा: मोठी बातमी: आजपासून एसटी बसचा प्रवास महागला; १५ टक्के भाडेवाढीचा निर्णय,
ऑक्टोबर २०२२ पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ झालेली नव्हती. पण इंधन आणि सीएनजीच्या दरात वाढ होत आहे. तसंच अॅप आधारित रिक्षा आणि टॅक्सी कंपन्यांमुळेही फटका सहन करावा लगात आहे, अशी भूमिका रिक्षा आणि टॅक्सी चालक घटनांनी घेतली होती. खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ केली जावी. त्यानुसार रिक्षाच्या किमान भाड्यात ३ रुपये आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात ४ रुपयांची वाढ करावी असा प्रस्ताव परिवहन विभागासमोर ठेवण्यात आला होता. त्यानंतर आज परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.