मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार, किमान भाड्यात ३ रुपयांची वाढ होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:41 IST2025-01-22T16:41:12+5:302025-01-22T16:41:52+5:30
मुंबईकरांना रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवासासाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार, किमान भाड्यात ३ रुपयांची वाढ होणार?
मुंबईकरांना रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवासासाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कारण लवकरच रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यामध्ये ३ रुपयांची वाढ होऊ शकते. भाडेवाढीचा प्रस्ताव रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनी परिवहन विभागाकडे दिला होता. त्यावर परिवहन विभागाकडून विचार केला जात आहे.
ऑक्टोबर २०२२ पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ झालेली नाही. पण इंधन आणि सीएनजीच्या दरात वाढ होत आहे. तसंच अॅप आधारित रिक्षा आणि टॅक्सी कंपन्यांमुळेही फटका सहन करावा लगात आहे, अशी भूमिका रिक्षा आणि टॅक्सी चालक घटनांनी घेतली होती. खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ केली जावी. त्यानुसार रिक्षाच्या किमान भाड्यात ३ रुपये आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात ४ रुपयांची वाढ करावी असा प्रस्ताव परिवहन विभागासमोर ठेवण्यात आला होता. अद्याप हा प्रस्ताव मंजूर झालेला नसला तरी या आठवड्यात त्यावर निर्णय होऊ शकतो असं बोललं जात आहे.
रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ झाल्यास रिक्षाचं किमान भाडं हे २३ रुपयांवरुन २६ रुपये इतकं होईल. तर टॅक्सीचं किमान भाडं २८ रुपयांवरुन ३१ रुपये इतकं होईल. यावर मुंबईकरांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. किमान भाड्यात थेट ३ रुपयांनी वाढ करणं चुकीचं ठरेल. सर्वसामान्य नागरिकांना भाडं परवडणारं नाही, असं एका नागरिकानं म्हटलं आहे.