Join us

फिल्टरपाड्यात महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला; आरोपी ऑडीची तोडफोड करुन फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:34 IST

पवईत एका महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Mumbai Crime : पवईतील फिल्टरपाडा परिसरात राहणाऱ्या महिला डॉक्टरवर ओळखीच्याच एका व्यक्तीने रविवारी चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोराने डॉक्टरच्या मोटारीच्या काचाही फोडल्या. या प्रकरणातील तक्रारदार बीकेसीतील नामांकित रुग्णालयात डॉक्टर आहे. 

रविवारी पहाटे पाच वाजता त्या कामावरून घरी परतल्या. त्यांनी गाडी आरे रोड येथील श्रीनाथ मेडिकलजवळ उभी केली होती. त्यानंतर त्या घरी जात असताना त्यांच्या ओळखीतील आणि सोसायटीशेजारी राहणारा अब्दुल्ला जुबेर खान समोर आला. नशेत असलेला खान चाकू उगारून डॉक्टरच्या अंगावर धावून आला. डॉक्टरांनी त्याचा हल्ला चुकवत धावत घर गाठले आणि आई, भावासह परत घटनास्थळी आल्या. त्यावेळी आरोपी त्यांच्या ऑडी कारची तोडफोड करत होता.

लोकांनी आरडाओरड केल्यावर आरोपीने चाकू हवेत फिरवून तिथून पळ काढला. डॉक्टरांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू आहे.

डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले की, "मी माझ्या गाडीने घरी जात होते. दरम्यान, माझ्या सोसायटीजवळ राहणारा अब्दुल्ला दारूच्या नशेत होता. त्याच्या हातात चाकू आणि रॉड होता. त्याने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण मी कसा तरी बचावलो." पोलिसांनी सांगितले की, आरोपी अब्दुल्ला फरार आहे आणि त्याच्या शोधासाठी छापे टाकले जात आहेत. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हल्ल्याचे कारण वैयक्तिक शत्रुत्व असू शकते. पण, नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, या घटनेने त्यांना धक्का बसला आहे. स्थानिक लोकही या घटनेने घाबरले आहेत. पवई पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :मुंबई पोलीसगुन्हेगारी