Join us

मुंबई-अहमदाबाद महामार्गही पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 12:14 IST

महामार्गावर लांबच लांब रांगा

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/वसई : हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला, तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गही पाण्याखाली गेला होता. 

जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू, तलासरी या तालुक्यांसह सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सुटी जाहीर केली. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खासगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. 

वाहने पडली बंद वसईतील अंतर्गत रस्त्यांवरदेखील पाणी साचले आहे. रस्त्यांतील खड्डे पाण्याने भरल्याने दुचाकी वाहने त्यात आदळून चालकांना इजा झाली आहे. तसेच काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने त्यात वाहनांच्या इंजिनात पाणी जाऊन वाहने रस्त्यातच बंद पडली होती. त्यामुळे वाहतूककोंडीत आणखीच भर पडली होती. तसेच धुवाधार पावसाने वसईतील मुख्य रहदारीचे रस्तेच चिखलमय झाले आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मुंबई व गुजरात वाहिनीवरील अनेक हॉटेलच्या समोरील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने व खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. महामार्ग पोलिस येथील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. अनधिकृत बांधकामांमुळे वसईची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ३ ते ४ किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागलेल्या असून, संथगतीने वाहतूक सुरू आहे.

टॅग्स :पाऊसमुंबई