Join us  

मुंबईत ४३९ शाळांना बसला पुराचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 6:10 AM

राज्यातील अतिवृष्टीबाधित शाळांचा आढावा शिक्षणमंत्र्यांनी घेतल्यानंतर, शाळांना आवश्यक निधी शिक्षण विभागाकडून तातडीने देण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी नुकतेच घोषित केले आहे.

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीबाधित शाळांचा आढावा शिक्षणमंत्र्यांनी घेतल्यानंतर, शाळांना आवश्यक निधी शिक्षण विभागाकडून तातडीने देण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी नुकतेच घोषित केले आहे. यामध्ये मुंबई विभागाच्या ठाणे, रायगड, पालघरच्या २७ पूरग्रस्त तालुक्यातील शाळांचा समावेश आहे. मुंबई विभागातील पूरग्रस्त तालुक्यांतील शाळांची संख्या ४३९ असून, अंदाजित विद्यार्थी संख्या ३२ हजार ९२५ इतकी आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विभागातील शाळांना ११ कोटी ९१ लाखांचा ६८ हजार २५० रुपयांचा निधी आवश्यक आहे. या संबंधित माहिती शाळा, मुख्याध्यापकांकडून वॉर्ड अधिकारी यांच्याकडून मागविण्यात आली होती.राज्यातील अतिवृष्टीबाधित शाळांचा आढावा शिक्षणमंत्र्यांनी घेतला. यात संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जिल्हे आणि तालुकानिहाय नुकसानीची माहिती घेण्यात आली. त्यानंतर, शिक्षणमंत्री शेलार यांनी पुरामुळे शाळांच्या इमारतींची झालेली पडझड, धोकादायक शाळेच्या इमारतीसह अन्य माहिती दिली आहे. मुंबई विभागातील ठाणे जिल्ह्यातील ७ पूरग्रस्त तालुक्यातील १९७ शाळांमध्ये अंदाजे १४,७७५ विद्यार्थी संख्या आहे. त्यासाठी ३ कोटी ४२ लाख १७ हजार २५० रुपयांची आवश्यकता आहे. पालघर जिल्ह्यातील ८ पूरग्रस्त भागात १८३ वर्गखोल्या दुरुस्तीची आवश्यकता असून, तेथील विद्यार्थी संख्या अंदाजे १३,७२५ इतकी असून, ५ कोटी ७७ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. मुंबई विभागातील रायगड जिल्ह्यातील १२ पूरग्रस्त तालुक्यांतील ५९ शाळांना दुरुस्तीची आवश्यकता असून, त्यासाठी २ कोटी ७२ लाख १० हजार निधी गरजेचा आहे. तर, रायगड जिल्ह्यातील ३५ किचनशेडसाठी आवश्यक ३९ लाख २५ हजारांच्या रकमेचाही यात समावेश आहे.नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांत ४० पूरग्रस्त तालुक्यांतील ७६० शाळांना निधीची आवश्यकता आहे. या निधीची रक्कम १४ कोटी १ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. नागपूर विभागातील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यांतील २७ पूरग्रस्त तालुक्यांतील ४१ शाळांमध्ये १ कोटी ५६ लाख निधीची आवश्यकता आहे. अमरावतीतील १२ तालुक्यांत ८७ शाळांत १ कोटी ५३ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. पुणे विभागासाठी ५१ लाखांच्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती मिळाली आहे.शिक्षण विभागातील पूरग्रस्त विभागातील शाळांचा आढावा घेऊन निधी पुरविण्यात येणार असला, तरी मागविलेल्या माहितीसाठी अत्यंत कमी कालावधी दिला होता. माहिती मागविण्याची मुदत वाढवून दिली असती, तर मुख्याध्यापक, शाळा, शिक्षकांना तो आणखी व्यवस्थित देता आला असता, अशा प्रतिक्रिया शिक्षक नोंदवित आहेत. कोल्हापूर विभागात ४६ पूरग्रस्त तालुके असून, शाळांची संख्या ८३९ इतकी आहे.कोल्हापूर विभागासाठी २७ कोटींची आवश्यकताकोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांसाठी दुरुस्ती व अन्य कामांसाठी सुमारे २७ कोटी ४० लाख ९७ हजार ५०८ इतक्या निधीची आवश्यकता आहे.

टॅग्स :शाळामुंबईपाऊस