Join us  

मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकण परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 7:23 AM

शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची ट्विटरवरुन माहिती

मुंबई: सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन याबद्दलची माहिती दिली आहे. सततच्या पावसामुळे मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार बॅटिंग सुरू आहे. आज मुसळधार होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून सरकारी आणि खाजगी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. मुसळधार पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ठाणे-सीएसएमटी दरम्यानची अप-डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. हार्बर रेल्वेची वाहतूकदेखील विस्कळीत झाली आहे. तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे. नालासोपारा भागात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे बोरिवली ते विरार दरम्यानच्या वाहतूक सेवेवर परिणाम झाला. मात्र चर्चगेट ते बोरिवली दरम्यानची वाहतूक सुरळीत सुरू आहे.  

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटशाळा