Join us  

Mansukh Hiren: चेहऱ्यासह डोळ्याजवळही छोट्या जखमा; मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणी गूढ आणखी वाढलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 7:51 AM

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मनसुख हिरेन यांचं शवविच्छेदन करण्यात आलं.

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी मुंब्य्रात सापडला. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. याचदरम्यान एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. 

शवविच्छेदन अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांच्या डोळ्याजवळ आणि चेहऱ्यावर छोट्या जखमा होत्या. तसेच त्यांच्या पाठीवर दोन ठिकाणी जखमा असल्याचे बोललं जात आहे. जर मनसुख  हिरेन यांनी आत्महत्या केली असेल तर एकाच बाजूला जखमा होणे अपेक्षित होते. मात्र दोन्ही बाजूला झालेल्या जखमांमुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढलं आहे. 

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मनसुख हिरेन यांचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्याचा अहवाल ठाणे पोलिसांना मिळाला आहे. मनसुख हिरेन यांचा बुडून मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मनसुख हिरेन यांचा व्हिसेरा पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहे. 

स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडल्यानं हिरेन यांची चौकशी

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मनसुख पुढे म्हणतात, २५ फेब्रुवारीला रात्री ११ वाजता एटीएसचे २-३ पोलीस माझ्या घरी आले. तुमची स्कॉर्पिओ गाडी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक भरलेल्या अवस्थेत सापडल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे मला धक्काच बसला. एटीएसच्या पोलिसांनी चौकशी केली आणि ते निघून गेले. त्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्याचे ४-५ पोलीस रात्री पावणे अकराच्या सुमारास घरी आले आणि चौकशी करुन निघून गेले. त्यानंतर २६ फेब्रुवारीला मध्यरात्री २ वाजता विक्रोळी पोलीस ठाण्याचे पोलीस आले आणि मला घेऊन गेले. सकाळी ६ पर्यंत त्यांनी मला ताब्यात ठेवलं आणि त्यानंतर घरी सोडलं.

चौकशीमुळे मानसिक स्वास्थ बिघडल्याचा दावा

मनसुख हिरेन तक्रारीत पुढे म्हणतात, २७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता विक्रोळी पोलीस ठाण्यातून फोन आला. त्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यातून ३ वाजता फोन आला. १ मार्चला संध्याकाळी ४ वाजता नागपाडा एटीएसमधून फोन आला. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययू ऑफिसमध्ये बराच वेळ चौकशी करण्यात आली. बराच वेळ परत परत प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर एनआयएनं चौकशी केली. पोलीस सहआयुक्त भाम्रे यांनी चौकशी केली. विविध तपास यंत्रणांकडून झालेल्या चौकशीमुळे माझं मानसिक स्वास्थ बिघडलं. बऱ्याच माध्यमांच्या पत्रकारांकडून वारंवार फोन येत आहेत. एका पत्रकारानं फोन करुन या प्रकरणात मी संशयित असल्याचं सांगितलं.

त्रासापासून मुक्तता हवी

मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात पोलीस आणि पत्रकारांना छळ करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं नमूद केलं आहे. पोलिसांकडून वारंवार होणाऱ्या चौकशीच्या त्रासापासून संरक्षण मिळावं, अशी मागणी मनसुख हिरेन यांनी केली आहे. माझी आणि माझ्या कुटुंबाची पोलीस आणि पत्रकारांकडून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता व्हावी, अशी मागणी मनसुख हिरेन यांनी पत्रातून केली.

सीडीआरमधून मृत्यूचे गूढ उलगडणार!

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत तपास यंत्रणांच्या हाती अद्याप ठोस माहिती लागलेली नाही. त्यांचा मोबाइलही गायब असल्याने त्याचे सीडीआर काढले जात आहे. दहशतवादविरोधी पथकाने शनिवारी ते ताब्यात घेतले. हिरेन यांना दोन दिवसांपासून आलेले मोबाइल व अखेरचा फोन कोणाचा आला होता, त्यांनी कोणाशी संभाषण केले होते, याचा उलगडा करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :मनसुख हिरणपोलिसडॉक्टरगुन्हेगारी