बोरीवली, कांदिवलीमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा; रोगराई पसरण्याची भीती; पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांत संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:09 IST2025-12-25T10:09:30+5:302025-12-25T10:09:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बोरीवली पूर्व भागासह कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात १५ दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. ...

बोरीवली, कांदिवलीमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा; रोगराई पसरण्याची भीती; पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांत संताप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरीवली पूर्व भागासह कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात १५ दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या संदर्भात तक्रार करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रोगराई पसरल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
एखादा मोठा प्रसंग घडण्याची वाट महापालिका प्रशासन बघत आहे का?, एवढे अत्याधुनिक तंत्रज्ञान पालिकेकडे असताना हे गढूळ पाणी कोठून व कसे येत आहे याचा शोध अद्याप का लागत नाही? असे प्रश्न रहिवासी नागरिक उपस्थित करत आहेत.
पालिकेचे अधिकारी, आम्ही याचा शोध घेत आहोत, अशी उत्तरे देत आहेत. तातडीने ही समस्या सोडवली गेली नाही, तर जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुधीर परांजपे व विनोद जाधव यांनी दिला आहे.
राजेंद्रनगर, जय जवान झोपडपट्टी आणि परिसरात बुधवारी पहाटेपासून गढूळ पाणी आले. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे, तरीही महापालिका प्रशासनाचे पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
रूपेश मोरे, रहिवासी
राजेंद्रनगर, बोरीवली (पूर्व)
दिवसाची सुरुवातच पालिकेच्या गढूळ पाण्याने झाली. परिसरातील नागरिकांनी गढूळ पाण्याने भरलेल्या पाण्याच्या टाक्या खाली केल्या. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तत्काळ स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा.
लेझ्झली जॉन रिचर्ड,
कुलदीप सोसायटी, बोरीवली (पूर्व)
यापूर्वी येथील गढूळ पाणीपुरवठ्यावर आमच्या पाणी खात्याने ठोस उपाययोजना केली होती. आज पुन्हा येथील नागरिकांची तक्रार आमच्याकडे आली. येथे गढूळ पाणी का येते? याचा शोध सुरू असून, गुरुवारी पहाटे ४ वाजता येथे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची तपासणी आमचे पथक करणार आहे.
जावेद सय्यद, सहाय्यक अभियंता,
पाणी खाते, आर मध्य.