एमटीएनएल इंटरनेटसेवा ठप्प झाल्याचा सरकारी कार्यालये, बँकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:28 IST2020-02-05T02:33:11+5:302020-02-05T06:28:37+5:30
वांद्रे पूर्व परिसरातील इंटरनेटसेवा गेल्या तीन-चार दिवसांपासून विस्कळीत असल्याचा फटका या भागातील सरकारी कार्यालये, सरकारी बँका यांना बसू लागला आहे.

एमटीएनएल इंटरनेटसेवा ठप्प झाल्याचा सरकारी कार्यालये, बँकांना फटका
मुंबई : महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)मधील हजारो कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने त्याचा परिणाम एमटीएनएलच्या सेवेवर पडू लागला आहे. वांद्रे पूर्व परिसरातील इंटरनेटसेवा गेल्या तीन-चार दिवसांपासून विस्कळीत असल्याचा फटका या भागातील सरकारी कार्यालये, सरकारी बँका यांना बसू लागला आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयालादेखील याचा फटका बसत आहे. त्यामुळे कामावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे.
वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालयासहित अनेक सरकारी कार्यालये, न्यायालयांची कार्यालये आहेत. या परिसरात अनेक सरकारी बँकादेखील आहेत. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या एमटीएनएलच्या इंटरनेटसेवेच्या व्यत्ययामुळे दैनंदिन काम करणे जिकिरीचे होऊ लागले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात इकॉनॉमिक सर्व्हेचे कामदेखील सुरू आहे. या ठिकाणी काम करताना इंटरनेट अत्यंत जरूरी आहे. मात्र, एमटीएनएलची इंटरनेटसेवा ठप्प असल्याने, या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना तातडीच्या कामांसाठी स्वत:च्या घरातील इंटरनेट हॉटस्पॉट वापरावे लागत आहे. त्यामुळे सरकारी कामांसाठी त्यांना आर्थिक भुर्दंड पडू लागला आहे.
एमटीएनएलच्या सुमारे ८० टक्केपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्याने सेवेबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठीदेखील त्यांच्याकडे पुरेसा प्रशिक्षित कर्मचारी, अधिकारी वर्ग उरलेला नाही, त्याचा फटका एमटीएनएल सेवा वापरणाºयांना बसू लागला आहे.