मुंबई: एमटीएनएलच्या केबल्स चोरणाऱ्या टोळीला चारकोप पोलिसांनी गस्तीदरम्यान रंगेहाथ पकडले. सोमवारी पहाटे सुमारे १:४५ वाजता चारकोप पोलिस ठाण्यास भेट देऊन मालवणी पोलिस ठाण्याकडे जात असताना चारकोप रोडवरील कॅप्सूल कंपनीसमोर फुटपाथवर टेम्पोच्या आड २० ते २५ व्यक्ती गटागटाने उभ्या असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांनी वाहन थांबवले. त्यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर घटनास्थळी टेम्पोची झडती घेतली असता एमटीएनएलच्या प्रत्येकी १० फूट लांबीचे त ३ इंच व्यासाचे सुमारे ८० ते १० केबल तुकडे आढळून आले. तसेच तीन मोठे कटर्सही जप्त करण्यात आले.
विविध कंपन्यांचे फोन जप्त
पोलिसांनी तनवीर मुखशेर शेख (२९), आदिल शपुद्दीन अन्सारी (३९), अनार कादर शेख (३९), अश्विन बाबू सूर्यवंशी (४३) आणि जाफर मुन्ना शेख (३२) या पाच जणांना अटक केली असून ते भांडुप येथील रहिवासी आहेत.
आरोपींकडून एक आयफोन १५, रेडमी, सॅमसंग आणि विवो कंपनीचे दोन मोबाइल फोन जप्त केले आहेत.
तसेच टाटा टेम्पो (एमएच ०४ केयू ६७६४), टीव्हीएस अॅक्सेस १२५ स्कूटर (एमएच ०३ ईडी ७५६७) आणि होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (एमएच ०३ सीक्यू १७०८) असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. चारकोप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.