MSRTC Strike: सरकारनं पगारवाढ केली, आता ST कर्मचाऱ्यांचा संप मिटणार का?, सदाभाऊ खोत म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 19:20 IST2021-11-24T19:20:00+5:302021-11-24T19:20:39+5:30
MSRTC Strike: राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी अंतरिम पगारवाढीचा मोठी घोषणा केली.

MSRTC Strike: सरकारनं पगारवाढ केली, आता ST कर्मचाऱ्यांचा संप मिटणार का?, सदाभाऊ खोत म्हणाले....
MSRTC Strike: राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी अंतरिम पगारवाढीचा मोठी घोषणा केली. एसटी महामंडळाचं विलीनीकरण राज्य शासनात करणं सध्या शक्य नसल्याचं सांगत अनिल परब यांनी कोर्टानं नेमलेल्या समितीचा निर्णय आल्यानंतरच पुढील निर्णय घेता येऊ शकेल असं म्हटलं आहे. पगार वाढीची घोषणा करताना अनिल परब यांच्यासोबत यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्त्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते.
अनिल परब यांनी सरकारची बाजू मांडत कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढ देण्याची घोषणा केली आहे. आता एसटी कर्मचारी संप मागे घेणार का? याबाबत सदाभाऊ खोत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सरकारनं काढलेला तोडगा एसटी कर्मचाऱ्यांसमोर मांडणार आहोत आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पुढील माहिती देऊ, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
"सरकारच्या वतीनं मंत्री अनिल परब यांनी त्यांची बाजू मांडली आहे. सरकारनं दिलेल्या पगारवाढीचा निर्णय आम्ही आता आझाद मैदानात जाऊन कर्मचाऱ्यांसमोर मांडू. त्यांचाशी चर्चा करू आणि संपाचा पुढील निर्णय जाहीर करू", असं सदाभाऊ खोत म्हणाले.
"एसटी महामंडळाचा राज्य शासनात विलीनीकरणाची मागणी आम्ही वेळोवेळी सरकारसमोर मांडली आहे. पण कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांची कोंडी झाली आहे. कोर्टानं नियोजित केलेल्या समितीनं निर्णय दिला तर सरकार विचार करेल असं आश्वासन दिलं आहे. तोवर पगारवाढीचा निर्णय सरकारनं दिला आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना आता सविस्तर माहिती देऊ. त्यावर कर्मचाऱ्यांचा जो निर्णय असेल त्यासोबत आम्ही असू", असंही सदाभाऊ खोत म्हणाले.