गणेशोत्सवाची ‘एसटी’क काळजी... राज्यभरातून महामुंबईसाठी मागवल्या ११०० बस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 06:51 IST2022-08-21T06:50:25+5:302022-08-21T06:51:14+5:30
गणेशोत्सव आणि कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी जादा एसटी बसेस धावत असतात

गणेशोत्सवाची ‘एसटी’क काळजी... राज्यभरातून महामुंबईसाठी मागवल्या ११०० बस
मुंबई :
गणेशोत्सव आणि कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी जादा एसटी बसेस धावत असतात, म्हणूनच राज्य परिवहन महामंडळाने मुंबई, ठाणे, पालघर या तीन विभागांसाठी एसटीचे विशेष नियोजन केले असून राज्यातील इतर १६ विभागांतील ११०० गाड्या वर्ग करण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या आरक्षित झालेल्या असतानाच एसटी महामंडळाने अडीच हजार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. २५ ऑगस्टपासून सुटणाऱ्या १ हजार ३०० जादा गाड्यांचे आरक्षण २५ जूनपासून करण्यात आले, तर कोकणातून परतीच्या प्रवासासाठी ५ ते ११ सप्टेंबरदरम्यान जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी ५ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात झाली आहे. सध्या मुंबई, ठाणे, पालघर येथून कोकणात जाणाऱ्या वैयक्तिक आरक्षण आणि गट आरक्षणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर गट आरक्षण (ग्रुप बुकिंग) होत आहे. आतापर्यंत कोकणात जाणाऱ्या २,७५७ गाड्यांना प्रतिसाद मिळाला आहे.
चालक-वाहकांच्या निवासाची व्यवस्था
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळे राज्यातील इतर विभागातून ११०० गाड्या मुंबईत आणण्यात येणार आहेत. या गाड्यांची पार्किंग महालक्ष्मी रेसकोर्स, वांद्रे कुर्ला संकुल आणि कुर्ला आगारात केली जाणार आहे. तसेच चालक आणि वाहकांच्या राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. - वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळ