सायन हॉस्पीटलमध्ये 'MRI' साठी लागतो १ महिना, रुग्णांना मोठा मनस्ताप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:36 IST2026-02-19T12:34:34+5:302026-02-19T12:36:14+5:30
वेळेवर बेड उपलब्ध न होण्याची तक्रारी आहेत. बेड उपलब्ध झाल्यावर चाचण्या करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. सीटी स्कॅन करण्यासाठी रुग्णांना ४ ते ५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागते.

सायन हॉस्पीटलमध्ये 'MRI' साठी लागतो १ महिना, रुग्णांना मोठा मनस्ताप!
मुंबई : सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयात एमआरआयसाठी ओपीडीमधील रुग्णांना एका महिन्यानंतरची तारीख देण्यात येत आहे. तर, दाखल रुग्णांना किमान ७ ते ८ दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे रुग्ण, त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप होतो.
वेळेवर बेड उपलब्ध न होण्याची तक्रारी आहेत. बेड उपलब्ध झाल्यावर चाचण्या करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. सीटी स्कॅन करण्यासाठी रुग्णांना ४ ते ५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. केस पेपर काढण्यासाठी सकाळी सहा वाजण्यापूर्वीपासून रांग लावावी लागते. केसपेपरच्या प्रक्रियेसाठी किमान अर्धा ते पाऊण तास लागतो. सकाळी साडेसहा ते दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ असली, तरी केसपेपर काढण्यास उशीर झाल्यास पुढील उपचाराला विलंब होतो.
एमआरआयसाठी ओपीडीच्या रुग्णांना कमाल दोन आठवडे, तर आयपीडी रुग्णांना कमाल २४ ते ४८ तास लागतात. धारावीतील केंद्रात गेल्यास एक किंवा दोन दिवसांत एमआरआय होतो. लहान मुलांच्या व गुंतागुंतीच्या प्रकरणांत एमआरआयसाठी वेगळे पथक लागत असल्याने काहीसा वेळ लागत आहे.
डाॅ. प्रमोद इंगळे, अधिष्ठाता, लोकमान्य टिळक रुग्णालय
जमिनीवर झोपवून उपचार
रुग्णांचे प्रमाण जास्त व जागा कमी अशी स्थिती आहे. कक्ष क्रमांंक ६ मध्ये तर बेड नसल्याने रुग्णांना जमीनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार करण्यात येतात.
काही महिन्यांपासून रुग्णालय परिसरात बांधकाम सुरू असल्याने बाहेरील वाहनांना प्रवेश बंद केला आहे. केवळ अत्यवस्थ रुग्ण, ज्येष्ठ नागरिक व रुग्णवाहिकांना प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे इतरांना पायपीट करावी लागते.