एमपीएससीच्या नोव्हेंबरमधील परीक्षा पुढे ढकलल्या; सुधारित वेळापत्रक जाहीर करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 06:50 IST2020-10-14T02:16:16+5:302020-10-14T06:50:39+5:30
MPSC Exam:कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवेची परीक्षा दोन वेळा पुढे ढकलली होती. त्यानंतर मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यापासून ११ ऑक्टोबरची राज्य सेवा परीक्षेचे काय होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात असताना ही परीक्षाही पुढे ढकलण्यात आली.

एमपीएससीच्या नोव्हेंबरमधील परीक्षा पुढे ढकलल्या; सुधारित वेळापत्रक जाहीर करणार
मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) ११ ऑक्टोबर रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन तात्पुरता प्रश्न सोडवला. त्यानंंतर आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आणखी दोन परीक्षा रद्द केल्याचे एमपीएससीने मंगळवारी जाहीर केले. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवेची परीक्षा दोन वेळा पुढे ढकलली होती. त्यानंतर मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यापासून ११ ऑक्टोबरची राज्य सेवा परीक्षेचे काय होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात असताना ही परीक्षाही पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता १ नोव्हेंबरची अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि २२ नोव्हेंबरची दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षाही एमपीएससीने पुढे ढकलली. तब्बल ४ लाख ४० हजार विद्यार्थी या दोन्ही परीक्षा देणार आहेत. वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा पार पाडण्यासाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात पोहचली असताना एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी तणावात असून परीक्षा होणार तरी कधी, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांकडून उपस्थित केला जात आहे.