मुंबई :महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या विशेष बाब म्हणून शासन सेवेतील प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी वयोमर्यादा झालेल्या पात्र उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळणार असून, त्यांना ६ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
राज्यात मागास वर्गासाठी राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या अधिसूचनेतील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनामार्फत पदसंख्या आणि आरक्षण नमूद करून सुधारित मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आली होती. त्यानुसार एमपीएससीने जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, एक वेळची विशेष बाब म्हणून वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय २० डिसेंबर रोजी घेण्यात आला. या निर्णयाच्या अनुषंगाने एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ या संवर्गाच्या जाहिरातींस अनुसरून निश्चित केलेल्या कमाल वयोमर्यादेमध्ये एक वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे.
६ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार
उमेदवारांना २६ डिसेंबर ते ६ जानेवारी या कालावधीत अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्यासाठी ६ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. दोन्ही परीक्षांसाठी नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना केवळ अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवरील परीक्षा उपकेंद्रांवर प्रवेश देण्यात येईल.