Join us  

शिंदे गटाचे खासदार कमळ चिन्हावर लढणार? चर्चेवर राहुल शेवाळेंचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 1:12 PM

तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील दणदणीत विजयानंतर भाजपसाठी सध्या देशभरात अनुकूल स्थिती असल्याचं सांगत शिवसेनेच्या काही खासदारांनी कमळ चिन्हावर लढण्याची भूमिका मांडल्याचं बोललं जात आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसं राज्यातील राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला. मात्र शिंदेंच्या शिवसेनेतील काही खासदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भाजपसाठी सध्या देशभरात अनुकूल स्थिती असल्याचं सांगत शिवसेनेच्या खासदारांनी अशी भूमिका मांडल्याचं बोललं जात आहे. मात्र शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबतच्या चर्चा फेटाळून लावत शिवसेनेचे सर्व खासदार पुन्हा धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणूक लढवतील, असं ठामपणे सांगितलं आहे.

शिवसेना खासदार कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांवर खुलासा करताना राहुल शेवाळेंनी म्हटलं आहे की, "अशी कोणतीही इच्छा एकाही खासदाराने व्यक्त केलेली नाही. शिवसेनेच्या १३ खासदारांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेचे सर्व खासदार हे पक्षाच्या तिकिटावरच आणि धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणूक लढवतील. काही लोक मुद्दाम अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत," असं शेवाळे म्हणाले. तसंच शिवसेनेच्या कोणत्याही खासदाराच्या मतदारसंघावर भाजपने दावा केलेला नाही. वरिष्ठ पातळीवर अशी कसलीही चर्चा झालेली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

"शिंदे आणि त्यांच्यासोबत नेते कमळाबाईचे गुलाम"

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. "एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक हे कमळाबाईचे गुलाम आहेत. धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवल्यास आता आपलं डिपॉझिटही वाचणार नाही, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे ते सर्वजण कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवतील," असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

टॅग्स :राहुल शेवाळेएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे