Join us

कोस्टल रोडला एमपीसीबीची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 06:39 IST

या प्रकरणी सोमवारी पालिकेचे अधिकारी, कंत्राटदार यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे.

मुंबई : प्रदूषण नियंत्रणासाठी एकीकडे महापालिकेने कठोर पावले उचललेली असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पालिकेच्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पालाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमावलीची अंमलबजावणी केली जात नसल्याचे आढळल्यामुळे ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी सोमवारी पालिकेचे अधिकारी, कंत्राटदार यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे.

सागरी किनारा मार्गाच्या पाहणीवेळी प्रकल्पस्थळी राडारोडा तसाच पडला होता, राडारोडावर पाणी फवारणी केली जात नव्हती. त्यामुळे या परिसरात धुळीचे लोट दिसत होते, असे आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंडळाने सागरी किनारा प्रकल्पाच्या कामामुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांना वैयक्तिक सुनावणीकरिता कृती आराखड्यासहित सोमवारी बोलावण्यात आल्याचे एमपीसीबीचे सहसंचालक व्ही. एम. मोटघरे यांनी सांगितले. 

टॅग्स :प्रदूषणमुंबई महानगरपालिका