Join us

मुंबई महापालिकेवर भाजप झेंडा फडकवेल - खासदार तेजस्वी सूर्या

By मनोहर कुंभेजकर | Updated: November 4, 2022 19:32 IST

मुंबई महापालिकेवर भाजप झेंडा फडकवेल असे खासदार तेजस्वी सूर्या यांनी म्हटले. 

मुंबई : सत्ता कुठल्या एका कुटुंबाचा हक्क असू शकत नाही. लोकांच्या पाठिंब्याने सत्ता येते, पैशांच्या पाठिंब्याने नाही. इथले सगळे तरुण सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. तुमचे वडील किंवा कुटुंबातील कोणी मंत्री नाही, असे म्हणत नाव न घेता भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष, खासदार तेजस्वी सूर्या यांनी वरळीत विरोधकांवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक गड-किल्ले उद्ध्वस्त केले आहेत, मुंबईवरही भाजप झेंडा फडकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या हस्ते वरळीत युवा वॉरियर या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

तेजस्वी सूर्या म्हणाले की, मुंबई हे भारतातील प्रमुख शहर आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबई आणि राज्याला ग्रहण लागले होते. मात्र, राज्यात भाजप आणि शिंदे यांचे सरकार आल्यानंतर हे ग्रहण सुटले आहे. आज मोदी आणि शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राचा विकास वेगाने होत आहे. पंतप्रधान मोदी यांचे सबका साथ, सबका विकास हे धोरण पुढे नेण्यासाठी आणि भाजपच्या युवा मोर्चाची ताकद वाढवण्यासाठी आज मी वरळीत आलो आहे. सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या तरुणांना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आगामी मुंबई महापालिका निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुका असतील, या निवडणुकीत तरुण प्रभावीपणे काम करतील असा विश्वास सूर्या यांनी व्यक्त केला. यावेळी मुंबई भाजप युवा मोर्चाचे तेजींदर सिंग तिवाना, भाजप महाराष्ट्र युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल लोणीकर, भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश युवा मोर्चा प्रभारी गौरव गौतम, भाजपा मुंबई उपाध्यक्ष श्वेता परुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

टॅग्स :मुंबईआदित्य ठाकरेभाजपावरळी