Join us  

खा.संभाजी महाराजांनी घेतली आंदोलनकर्त्या मेडिकल विद्यार्थ्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 1:58 PM

गेल्या 9 दिवसांपासून आझाद मैदान येथे मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनस्थळी भाजपाचे खासदार संभाजी महाराज यांनी भेट घेतली. यावेळी संभाजी महाराजांनी विद्यार्थ्यांचे म्हणणं ऐकून घेतलं. 

मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणामुळे न्यायालयाने 213 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले. त्याविरोधात गेल्या 9 दिवसांपासून आझाद मैदान येथे मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनस्थळी भाजपाचे खासदार संभाजी महाराज यांनी भेट घेतली. यावेळी संभाजी महाराजांनी विद्यार्थ्यांचे म्हणणं ऐकून घेतलं. 

यावेळी बोलताना खासदार संभाजी महाराज म्हणाले की, शासनाने चांगल्या भावनेने मराठा आरक्षण दिलं होतं. काही त्रुटींमुळे आरक्षणाचा फटका मेडिकलच्या विद्यार्थ्यांना बसला. त्यातून आता हे आरक्षण न्यायालयात टिकेल हे सिद्ध करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे म्हणणं मांडून चर्चेतून तोडगा काढू असं आश्वासन खासदार संभाजी महाराज यांनी विद्यार्थ्याना दिलं अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संतोष पवार यांनी दिली. 

मागील अनेक दिवसांपासून वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा वाद चिघळत चालला आहे. अनेक राजकीय पक्षाचे नेते आझाद मैदान येथे भेट देतात. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज्य शासनाने ठोस भूमिका न घेतल्याने मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानातल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री स्वत: या प्रकरणात लक्ष घालत असल्याचं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं. महाविद्यालयाची निवड करण्यासाठी आलेली मुदत वाढवून देण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयाच्या निवडीसाठी आठवड्याभराची मुदतवाढ दिली. 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनीही या विद्यार्थ्यांची भेट घेत राज्य सरकारवर निशाणा साधला होता. राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार असूनही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही, हे या सरकारचं अपयश आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच विद्यार्थ्यांना फटका बसलाय. मग हे फडणवीस सरकार की, फसणवीस सरकार? अशी टीका अजित पवारांनी सरकारवर केली. दरम्यान, मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आझाद मैदानावर आंदोलन छेडलंय. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा नववा दिवस आहे. जर मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा देखील इशारा वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून देण्यात आलाय. यंदाच्या शैक्षणिक वर्षात दंत वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. याच मुद्द्यावरून मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलंय.

 

टॅग्स :मराठाभाजपावैद्यकीयसंभाजी राजे छत्रपती