Join us
Daily Top 2Weekly Top 5

“कारागृहात घरचे जेवण द्या, खाण्याची आबाळ होतेय”; राणा दाम्पत्याची कोर्टाला याचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 18:00 IST

खासदार नवनीत राणा भायखळा, तर आमदार रवी राणा ऑर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत.

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी हनुमान चालीसा म्हणण्याचा केलेला निर्धार आणि त्यानंतर राज्य सरकारच्या यंत्रणेलाच आव्हान दिल्याच्या आरोपाखाली राणा दाम्पत्यावर भारतीय दंड संहितेतील १२४-अ हे राजद्रोहाचे (Sedition) अत्यंत गंभीर कलम लावण्यात आले आहे. राणा दाम्पत्य सध्या कोठडीत आहेत. जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा तुरुंगात तर रवी राणा ऑर्थर रोड तुरुंगात असणार आहेत. कारागृहात घरचे जेवण मिळावे, यासाठी राणा दाम्पत्याने कोर्टात अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे. 

राणा दाम्पत्याला वांद्रे कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी शनिवारी सुनावणी होणार आहे. त्यामध्ये राज्य सरकारच्या वतीने वकील प्रदीप घरत बाजू मांडतील तर वकील रिझवान मर्चट राणा दाम्पत्याची बाजू मांडणार आहेत. पुढील सुनावणीपूर्वी राणा दाम्पत्याने घरचे जेवण मिळावे, म्हणून अर्ज केला आहे. राणा दाम्पत्याविरोधात खार पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा नोंद केल्यानंतर आक्रमक झालेल्या राणांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात तक्रार केली आहे. 

विविध कलमांतर्गत राणा दाम्पत्यावर गुन्हे दाखल

मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणायचा पवित्रा मागे घेतल्यानंतर लगेचच नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली होती. त्यांनंतर राणा दाम्पत्याला रविवारी वांद्रे कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राणा दाम्पत्याविरोधात लावण्यात आलेला राजद्रोहाचा एफआयआर रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळली. राणा दाम्पत्याने यानंतर मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर मुंबई पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, प्रक्षोभक वक्तव्य यासंदर्भात गुन्हे दाखल केले आहेत. 

टॅग्स :नवनीत कौर राणारवि राणा