Join us
Daily Top 2Weekly Top 5

खासदार अमोल कोल्हेंचा वसुलीचा आरोप, मुंबई वाहतूक पोलिसांनीही दिलं प्रत्युत्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 06:08 IST

वाहतूक पोलिसांना मुंबईत वसुलीचे टार्गेट, खासदार अमोल कोल्हे यांचा आरोप

मुंबई - मुंबईमध्ये वाहतूक पोलिसांना वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. त्याबाबतचा मेसेज वाहतूक पोलिसांना पाठविण्यात आल्याचा गंभीर आरोप  राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. याबाबत एक्स अकाउंटवर त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तर वाहतूक पोलिसांनी ई-चालान दंडाची रक्कम थकीत असून ती रक्कम शासनजमा करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. 

अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की,  मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाइन दंड भरण्यास सांगितले. कोल्हे यांनी स्वतः  याची माहिती घेताना त्या महिला वाहतूक पोलिसाने थेट मोबाइलवरील मेसेज दाखवला. यात प्रत्येक चौकात २५ हजार रुपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असे लिहिले होते, असा आरोप कोल्हे यांनी केला. मुंबईत ६५२ ट्रॅफिक जंक्शन आहेत. २५ हजार रुपेप्रमाणे या जंक्शन्सकडून १.६३ कोटी रुपये मिळतात तर इतर शहरांचे काय? असा सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, कोल्हे यांनी १६,९०० रुपयांचा दंड थकविला आहे, असे मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले.

वाहतूक पोलिसांचे उत्तरमुंबईत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केलेल्या १.३१ कोटींपेक्षा अधिक ई-चालानधील ६८५ कोटी रुपयांपेक्षा अधिक दंडाची रक्कम १ जानेवारी २०१९ पासून प्रलंबित आहे. दंडाची ही रक्कम शासनजमा करण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांमध्ये वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी शनिवार आणि रविवार या दिवशी दंड वसुलीची मोहीम हाती घेण्यात येते. अशा प्रकारचा  संभ्रम निर्माण करणारा संदेश समाजमाध्यमावर प्रसारित करण्यापूर्वी आपण जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याने पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थितीची माहिती घेऊन आपण संदेश प्रसारित करणे अपेक्षित होते, असे सह पोलिस आयुक्त (वाहतूक) प्रवीण पडवळ यांनी म्हटले आहे. 

टार्गेट दिले जातेच...गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांना सातत्याने वसुलीचे टार्गेट दिले जाते. प्रत्येक वाहतूक विभागाला एक टार्गेट देण्यात येते. दररोज वेगवेगळ्या मोहीम राबविण्यास सांगितले जाते. यामध्ये कधी हेल्मेट तपासणी, सीटबेल्ट तपासणी, नो-पार्किंग कारवाई आदी मोहीम राबविल्या जातात, असे वाहतूक विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेमुंबई पोलीस