Join us  

आर.के.स्टुडिओचे हे यादगार सिनेमे, ज्यांना मिळाला 'बेस्ट फिल्म'चा अवॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 7:40 PM

चेंबूरमधील आर.के. स्टुडिओ शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये जळून भस्मसात झाला आहे. या वैभवशाली स्टुडिओचा निराळाच असा इतिहास आहे. अग्नितांडवात आर.के. स्टुडिओ जळून खाक झाल्याने चित्रपटप्रेमींनी खंत व्यक्त केली आहे. 

मुंबई, दि. 16 - चेंबूरमधील आर.के. स्टुडिओ शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये जळून भस्मसात झाला आहे. या वैभवशाली स्टुडिओचा निराळाच असा इतिहास आहे. अग्नितांडवात आर.के. स्टुडिओ जळून खाक झाल्याने चित्रपटप्रेमींनी खंत व्यक्त केली आहे.  आर.के. स्टुडिओची स्थापना बॉलिवूडचे 'शो मॅन' सुप्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांनी केली होती. त्यांच्याच नावावरुन या स्टुडिओचे नामकरण करण्यात आले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बरोबर एक वर्षानंतर म्हणजे 1948मध्ये त्यांनी या स्टुडिओची स्थापना केली. या स्टुडिओचा पहिला सिनेमा 1948 साली रिलीज झालेला 'आग'. मात्र, बॉक्सऑफिसवर या सिनेमाला फारसं यश मिळालं नाही. यानंतर आर.के. स्टुडिओमध्ये 1949 मध्ये बरसात सिनेमाची निर्मिती करण्यात आली आणि या सिनेमाला रसिकांनी भरभरुन प्रेम केले.  यानंतर आर.के. स्टुडिओनं 'बूट पोलिश','जागते रहो', 'अब दिल्ली दूर नहीं' अशा अनेक सिनेमांची निर्मिती केली. पण, आर.के. स्टुडिओच्या अशा सिनेमांबाबतची माहिती जाणून घेऊया ज्या सिनेमांना सर्वात्कृष्ट सिनेमा पुरस्काराने गौरवण्यात आले.  

जिस देश में गंगा बेहती है आर.के. स्टुडिओनं 'जिस देश में गंगा बेहती है' या सिनेमाची 1960 साली निर्मिती केली. या सिनेमाचं दिग्दर्शन राधू कर्माकर यांनी केले होते आणि राज कपूर या सिनेमाचे निर्माते होते. शिवाय, या सिनेमामध्ये राज कपूर यांनी महत्त्वपूर्ण अशी भूमिकादेखील निभावली.  या सिनेमामध्ये अभिनेते प्राण आणि पद्मिनी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. दिग्दर्शक म्हणून कर्माकर यांचा हा पहिला सिनेमा होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले. एवढंच नाही तर सिनेमाला फिल्म फेयरमध्ये ''बेस्ट फिल्म अवॉर्ड'' देऊन गौरवण्यातही आले. 

राम तेरी गंगा मैलीराज कपूर यांनी दिग्दर्शित केलेला 'राम तेरी गंगा मैली' हा सिनेमा 1985 साली बॉक्सऑफिसवर झळकला. बॉलिवूडच्या शो मॅननं दिग्दर्शित केलेला हा अखेरचा सिनेमा. या सिनेमात अभिनेत्री मंदाकिनी आणि राज कपूर यांचा मुलगा राजीव कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. राज कपूर यांच्या या सिनेमानं बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आणि 1985 सालातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून रेकॉर्डही नोंदवला. रविंद्र जैन यांनी सिनेमाला संगीत दिले होते, यासाठी त्यांनी फिल्म फेअर अवॉर्डनं गौरवण्यातही आले होते. 

प्रेम रोगआर.के. फिल्म्सचा हा सिनेमा एका रोमाँटिक कहाणीवर आधारित होता, याचेही दिग्दर्शन स्वतः राज कपूर यांनी केले होते. 1982 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात शम्मी कपूर, ऋषि कपूर, पद्मिनी कोल्हापुरे यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या सिनेमालाही फिल्म फेअरमध्ये बेस्ट फिल्म अवॉर्डनं सन्मानित करण्यात आले होते. 

दरम्यान, आर. के. फिल्म्स व्यतिरिक्त या स्टुडिओमध्ये नामवंत चित्रपटांच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांचंही चित्रिकरण करण्यात आले आहे, ज्यात जी.पी सिप्पी, बप्पी सोनी, प्रमोद चक्रवर्ती, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई अन्य चित्रपटांचा समावेश आहे. त्याशिवाय, उपग्रह वाहिन्यांचे आगमन झाल्यावर अनेक रिअॅलिटी शोचेदेखील येथे चित्रिकरण करण्यात आले आहे.  

टॅग्स :चेंबूरआर के स्टुडिओ