Join us  

सीएए, एनआरसी कायदा मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच; नागपाड्यातील आंदोलक महिलांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 3:52 AM

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) नागपाडा येथे सुरू असलेले महिलांचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलक महिलांनी घेतला आहे.

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) नागपाडा येथे सुरू असलेले महिलांचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलक महिलांनी घेतला आहे. जोपर्यंत हे कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे महिलांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

जावेद आनंद, डॉल्फी डिसोझा यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नागपाडा येथे भेट देऊन आंदोलनामध्ये सहभाग घेतला. जोपर्यंत राज्याच्या विधिमंडळात या कायद्यांविरोधात ठराव मंजूर करण्यात येत नाही व संसदेत ते रद्द करण्यात येत नाहीत, तोपर्यंत नागपाडा येथील आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, काहीही झाले तरी माघार घेणार नाही, असे मिठीबोरवाला यांनी स्पष्ट केले.

पोलिसांची परवानगी घेतली नसल्याने हे आंदोलन बेकायदा आहे, त्यामुळे ते मागे घ्यावे व पोलिसांची रीतसर परवानगी घेऊनच आंदोलन करावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत समन्वय समितीने गुरुवारी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली होती.

आंदोलकांवर गुन्हे दाखल

नागपाडा मोरलॅड रोड येथे सीएए आणि एनआरसी या कायद्याच्या अंमलबजावणी विरूद्ध ठिया आंदोलन केले होते. यावेळी आंदोलकांनी मोरलॅड रोडचे डांबरीकरणाचे काम करणाºया कामगारांना प्रतिबंध करत तेथील खुर्च्या आणि लाकडी स्टेज बांधून अडथळा करत वाहतूकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी येथील २०० ते ३०० महिला आंदोलक आणि आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :नागरिकत्व सुधारणा विधेयकएनआरसीमहाराष्ट्र सरकारमुंबईपोलिस