आईच्या इच्छेचा अवयवदानातून राखला सन्मान; सुधा चिंतावार यांच्यामुळे तिघांना जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 08:05 IST2025-05-24T08:05:46+5:302025-05-24T08:05:46+5:30
ऐरोली येथील सुधा चिंतावार यांना ‘ब्रेन हॅमरेज’मुळे उपचारासाठी नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात सोमवारी दाखल करण्यात आले.

आईच्या इच्छेचा अवयवदानातून राखला सन्मान; सुधा चिंतावार यांच्यामुळे तिघांना जीवनदान
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ऐरोली येथील सुधा चिंतावार यांना ‘ब्रेन हॅमरेज’मुळे उपचारासाठी नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात सोमवारी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सुधा चिंतावार यांनी व्यक्त केलेल्या इच्छेचा सन्मान राखत त्यांचे अवयवदान केले. त्यांच्या अवयवदानामुळे तीन जणांना जीवनदान मिळाले आहे. मुंबई विभागातील या वर्षातील हे १९ वे अवयवदान आहे.
सुधा चिंतावार या नियमित तपासणीसाठी सोमवारी एमजीएम रुग्णालयात गेल्या होत्या. त्यांना एक्स-रे काढायचा होता. मात्र अचानक चक्कर येऊन त्या रुग्णालयातच कोसळल्या. त्यांना तेथेच उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल केले होते. मंगळवारी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाइकांना त्या मेंदूमृत झाल्याचे सांगितले.
यवतमाळ येथेच अवयवदानाचा अर्ज भरला होता...
याबाबत त्यांचा मुलगा अविनाश चिंतावार यांनी सांगितले की, रुग्णालयातील डॉक्टरांनी आईच्या स्थितीबद्दल माहिती दिल्यानंतर आम्ही तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला माझे वडील आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनीही एकत्रितपणे संमती दिली.
माझ्या आईने यवतमाळ येथे असतानाच अवयवदानाचा अर्ज भरला होता. त्याची माहिती दिली होती. आज माझी आई सोबत नसली तरी ती अवयवरूपी जिवंत आहे. तिच्यामुळे तीन रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. राज्यात गरजेच्या तुलनेत मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी होणाऱ्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव दान होण्याचे प्रमाण आणि अवयवाची गरज यात मोठी तफावत आहे.