Mother kills girl in protest over love affair | ‘साहेब, मीच मुलीची हत्या केली'; मुलीला संपवून आईनं गाठलं पोलीस स्टेशन
‘साहेब, मीच मुलीची हत्या केली'; मुलीला संपवून आईनं गाठलं पोलीस स्टेशन

मुंबई : प्रेमसंबंधाला नकार असतानाही प्रियकरासोबत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या २३ वर्षीय मुलीची आईनेच हत्या केली. हत्येनंतर पोलीस ठाणे गाठून, ‘साहेब, मीच मुलीची हत्या केली,’ अशी कबुली आईने दिल्याची घटना रविवारी पायधुनीत घडली. पाप्पू वाघेला (४०) असे आईचे नाव असून, पोलिसांनी तिच्यासह  मुलीचा भाऊ आकाश याला अटक केली आहे.

पायधुनी येथील संत तुकाराम रोडवर निर्मला अशोक वाघेला (२३) ही आईसोबत राहायची. गेल्या काही दिवसांपासून निर्मलाचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला तिच्या आईचा विरोध होता. तिने त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवू नये, असे आईचे म्हणणे होते. यावरूनच रविवारी रात्री ९ वाजता दोघांमध्ये वाद झाले. निर्मलाने प्रियकरासोबत निघून जाण्यासाठी कपडे भरण्यास सुरुवात केली. याच रागात आईने तिचा ओढणीने गळा आवळला. त्यानंतर स्वत:च पायधुनी पोलीस ठाणे गाठून हत्येची कबुली दिली. त्यानुसार, पायधुनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून निर्मलाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आई व भावाला अटक केली असून हत्येसाठी वापरलेली ओढणीदेखील जप्त करण्यात आली आहे.

Web Title: Mother kills girl in protest over love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.