Join us

आईला लुटणाऱ्या चोराच्या पोलिसाने आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 08:02 IST

बोरीवलीतील घटना : पाठलाग करून पकडले, जमावाने दिला चोप

मनीषा म्हात्रे

मुंबई : डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून तरुणाने वृद्धेकडे पाणी मागितले. पाणी पित असतानाच तिच्या गळ्यातील सोनसाखळी घेऊन त्याने पळ काढला. हा प्रकार बोरीवलीत राहणाºया महिला पोलिसाच्याच घरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला. आईचा चोर चोर... ओरडण्याचा आवाज कानी पडताच, महिला पोलिसाने त्याचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या.

बोरीवलीच्या गोराई रोड परिसरात प्रमोदिनी चव्हाण या आई सुभद्रा गोपाळ चव्हाण (६०) यांच्यासोबत राहतात. प्रमोदिनी या अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सोमवारी रात्री दोघींनी जेवणाचा बेत उरकला. प्रमोदिनी बेडरूममध्ये झोपण्यासाठी निघून गेल्या. रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांची आई कामानिमित्त शेजारी गेली होती. तेथून त्या घरी आल्या, तेव्हा एक मुलगा त्यांच्या घरातील पाय पुसणीला पाय पुसताना दिसला. त्यांनी त्याला कोण पाहिजे? असे विचारताच, त्याने डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून पाण्याची मागणी केली. एक ग्लास पाणी पिऊन झाल्यावर त्याने आणखी एक ग्लास पाणी मागितले. आईने पाणी देताच, तरुणाने आजूबाजूला पाहत हळूच त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. आईच्या ‘चोर चोर’ या आवाजाने प्रमोदिनी बाहेर आल्या. त्यांनी चोराचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले.सोनसाखळी परत मिळालीच्शहानवाझ वली मोहमद अगवान असे चोराचे नाव असून, तो मालवणी परिसरात राहतो. त्याला नागरिकांनी चोप दिला. बोरीवली पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अगवानला अटक केली. त्याच्याकडून आईची चोरलेली ८७ हजार रुपयांची सोनसाखळीही पोलिसांनी जप्त केली असून, आईला परत दिली आहे. त्याच्याकडे अधिक तपास सुरू असल्याची माहिती बोरीवली पोलिसांनी दिली.

टॅग्स :गुन्हेगारीअटक