Most of the city's hospitals were closed, and the municipality commissioner ordered Kerala's basket | शहरातील बहुतांश दवाखाने बंदच, पालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

शहरातील बहुतांश दवाखाने बंदच, पालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

ठाणे : नोंदणीकृत रु ग्णालये,तसेच मेडिकल बंद ठेवल्यास कारवाई करण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. परंतु असे असतांनाही शहरातील अनेक भागात खासकरुन झोपडपटटी भागातील दवाखाने बंदच असल्याचे चित्र दिसून आले आहे. काही मोठ्या रु ग्णालयाच्या ओपीडी देखील बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या भीतीमुळे डॉक्टर देखील धास्तावले असून त्यांनी आपापले दवाखाने बंद ठेवल्याने ठाणेकरांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे काही डॉक्टरांच्या संघटनेने तर दवाखाने उघडू नका, आणि उघडायचे असल्यास तुमच्या जबाबदारीवर उघड अशा सूचनाच दिल्या आहेत तर प्रोटेक्टीव्ह किट नसल्याने दवाखाने उघडण्यास अडचणी येत असल्याचे काही डॉक्टरांचे म्हणणे असून यावर लवकर तोडगा काढण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
              ठाणे शहरामध्ये कोरोनाचा प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तसेच सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य विषयक सेवा देणे अतिशय महत्वाचे असून जी नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने तसेच संबंधित आरोग्य विषयक खाजगी आस्थापना बंद राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १९८७ च्या या अधिनियमांतील तरतुदींद्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून पालिका आयुक्तांनी ठाणे शहरातील नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने तसेच संबंधित आरोग्य विषयक खाजगी आस्थापना बंद राहिल्याचे निदर्शनास आल्यास त्या आस्थापनांचे परवाने रद्द करण्याबरोबरच त्यांचेवर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पालिका आयुक्तांचा हा आदेश मात्र ठाण्यातील छोट्या-छोट्या दवाखान्यांनी गांभीर्याने घेतला नसून शहरातील जवळपास ९० टक्के दवाखाने आदेश दिल्यानंतरही बंदच असून क्वचित एखादा दवाखाना सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. कळवा, खारेगाव, नौपाडा, कोपरी अशा ठिकाणचे छोटे छोटे दवाखाने बंदच असून जर तातडीने जर ट्रीटमेंटची गरज पडली तर जायचे कुठे असा प्रश्न आता सर्वसामान्य ठाणेकरांना पडला आहे. काही डॉक्टरांनी आपण आपल्या रु ग्णासोबत दूरध्वनीवरून संपर्कात असल्याचा दावा केला आहे. तरी काही डॉक्टरांनी गरज पडल्यास फोनवरून औषध सांगत असल्याचे स्पष्ट केले आहे. इंडियन मेडिकल असोशिएशनचे ठाणे शाखेचे अध्यक्ष डॉ. दिनकर देसाई यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या भीतीमुळे पेंशट दवाखान्यात यायला तयार नाहीत. तर आपल्याकडे दवाखाने सुरु ठेवण्यासाठी जे प्रोटेक्टीव्ह किट लागते ते उपलब्ध नाही. तसेच बाहेर हे किट फारच महाग आहे. जर डॉक्टरांना लागण झाली तर संपूर्ण वैद्यकीय व्यवस्था कोलमडेल. त्यामुळे राज्य शासनाने यावर लवकर तोडगा काढणे गरजेचे असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली असून दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश यापूर्वीच सर्वाना दिले आहेत. जर या आदेशाचे पालन करत नसतील तर शहरातील जे दवाखाने बंद आहेत त्यांचा सर्व्हे करून त्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल अशी माहिती पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे.


  • परवाने रद्द करा - महापौर नरेश म्हस्के यांचे प्रशासनाला आदेश

ठाणे शहरातील खाजगी दवाखाने व रु ग्णालये बंद असल्याने रूग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्र ारी प्राप्त होत आहेत. खाजगी दवाखाने व रूग्णालये बंद ठेवून रु ग्णांची गैरसोय करणाऱ्या डॉक्टरांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील असे आदेश प्रशासनाने देवून सुध्दा ज्या खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले नाहीत अशा खाजगी डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत.

 

Web Title: Most of the city's hospitals were closed, and the municipality commissioner ordered Kerala's basket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.