Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांचा मृत्युदर वाढल्याने रुग्णालायची शवागृहे भरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 15:27 IST

केईएम रुग्णालयात मृतदेह कॉरिडॉर मध्ये  इतर रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्येने हजाराचा आकडा पार केला आहे. अशा . परिस्थितीत शहरातील रुग्णालयातील बेड्सची संख्या रुग्णांसाठी अपुरी पडतच आहे मात्र आता शावागृहे ही भरली जाऊ लागली आहेत. याच पुरावा म्हणजे केईएम रुग्णालयातील शवागृह भरल्याने रुग्णालय प्रशासनाला मृतदेह कॉरीडोरमध्ये ठेवण्याची वेळ आली आहे. सोमवारी सकाळपासूनच रुग्णालयाच्या कॉरिडोरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून  इतर रुग्णालयांत याहून ही अधिक विदारक परिस्थिती असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युसंख्येत वाढ झाली मात्र मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी असणारी यंत्रणा, नातेवाईकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास लागणारा  वेळ यांमुळे शवागृहांच्या यंत्रणेवरही ताण येत असल्याने हे चित्र पहायला मिळत असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ३१  हजाराच्या वर गेला आहे. त्यामुळे केईएम सारख्या महत्त्वाच्या रुग्णालयातील ताण निश्चित वाढला आहे. परळ येथील केईएम रुग्णालयात कोरोना कोविड १९च्या बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.  या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत. येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने  येथे कोरोना बाधित रुग्ण ही मोठ्या प्रमाणा वर येत आहेत. तसेच कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यांची संख्याही जास्त असल्याचे दिसून येत आहे. केईएम रूग्णालयाच्या शवागरात २७  मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. मात्र दररोज चे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने या शवागृहाची क्षमता संपली आहे. त्यामुळे अनेक मृतदेह मृतदेह कॉरीडोरमध्ये ठेवण्याची वेळ मुंबई पालिकेच्या रुग्णालय प्रशासनावर आली आहे. केईएम रुग्णालयात सध्या एकूण ३७ मृतदेह आहेत. त्यातील १० मृतदेह सध्या केईएमच्या कॉरिडॉर मध्ये ठेवण्यात आले आहेत.तसेच गेल्या दोन दिवसांत शवागृहातील सात कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शवागृहात आता कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. शवागृहात जागा कमी, रुग्णालयात कर्मचारी कमी या कात्रीत प्रशासन सापडल्याचे दिसून येत आहे.  एकीकडे कोरोनाबाधित मृतदेहांची हेळसांड होऊ नये , ताबडतोब विल्हेवाट लावण्यासाठी पालिका प्रशासनाने एक समिती देखील नियुक्त करून नवीन नियमावली बनवली आहे. तरी देखील मयतांचा कुटुंबियांकडून प्रतिसाद न मिळणे , पोलीस पंचनाम्याला उशीर होणे , दहन भूमीमधील गर्दी यांमुळे मृतदेह रूग्णालयातच  बराच वेळ ठेवावे लागतात. यामुळे मृतदेह पडून राहण्याच्या घटना वाढत असून या समस्या रुग्णालय प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. तर दुसरीकडे सायन आणि केईएम रुग्णालयात कोरोनाच्या मृतदेहांच्या बाजूला रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. याची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांसाठी वेगळी सोय करावी, असे आदेश सर्व रुग्णालयांना दिले होते. परंतु, पालिका प्रशासनाच्या आदेशानंतरही केईएम रुग्णालयात कोरोनाचे मृतदेह शवागृहाच्या मोकळ्या जागेत ठेवले जात असल्याने सामान्य नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस