आठ हजारांहून अधिक बॅनर्स, पोस्टर्स हटविले; गेल्या १० दिवसांतील महापालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:32 IST2025-12-26T09:32:01+5:302025-12-26T09:32:08+5:30
पालिका निवडणुकीची आचारसंहिता १६ डिसेंबरला लागू झाली. तिचे काटेकोर पालन व्हावे म्हणून अनुज्ञप्ती विभागाने युद्धपातळीवर फलक हटविण्याची कारवाई हाती घेतली.

आठ हजारांहून अधिक बॅनर्स, पोस्टर्स हटविले; गेल्या १० दिवसांतील महापालिकेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे गेल्या दहा दिवसांत आठ हजारांहून अधिक बॅनर्स आणि पोस्टर्स हटविण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी दिली. ही कारवाई पुढेही सुरू राहणार आहे.
पालिका निवडणुकीची आचारसंहिता १६ डिसेंबरला लागू झाली. तिचे काटेकोर पालन व्हावे म्हणून अनुज्ञप्ती विभागाने युद्धपातळीवर फलक हटविण्याची कारवाई हाती घेतली. त्यानुसार नियमबाह्य आणि बेकायदा जाहिरात फलक, बॅनर्स, किऑस्क, स्टिकर्स, होर्डिंग, चिन्हे, ध्वज, फलक, तसेच भिंतीवरील राजकीय जाहिरातींसह अन्य साहित्य हटविण्यात आले. त्यांची संख्या आठ हजारांहून अधिक आहे.
पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
आचारसंहितेचे पालन
निवडणूक आचारसंहितेचा भाग
म्हणून राजकीय जाहिरात फलक,
होर्डिंग किंवा फ्लेक्स राहू नयेत,
यासाठी ही कारवाई सुरू आहे, असे सांगण्यात आले.
राजकीय बॅनर्स, पोस्टर्सवर कारवाई करण्यात येत असून, संबंधित राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिकेला सहकार्य करावे. तसेच कोणत्याही स्वरूपात आचारसंहितेचा भंग होईल असे साहित्य लावू नये.
चंदा जाधव,
उपायुक्त, मुंबई महापालिका