Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुंदरीच्या मोहात, आरोपी जाळ्यात! हजाराहून अधिक फरार आरोपी अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 10:47 IST

फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून अनेकदा हनी ट्रॅपचा आधार घेतला जात आहे.

मुंबई : फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून अनेकदा हनी ट्रॅपचा आधार घेतला जात आहे. तसेच, वेगवेगळ्या भूमिका साकारत फरार आरोपींपर्यंत पोलिस पोहचताना दिसत आहेत. गेल्या चार वर्षांत मुंबई पोलिसांनी हजाराहून अधिक फरार आरोपीना अटक केली आहे. तसेच, दिवसाआड एका तडीपार आरोपीवर पोलिसांकडून कारवाई होताना दिसत आहे. 

पोलिसांचा गस्तीवर भर :

तडीपार केले असतानाही काही तडीपार आरोपीकड़ून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पोलिसांकड़ून तत्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तडीपार आरोपींवरील कारवाईसाठी पोलिसांकड़ून गस्तीवर भर देण्यात आली आहे. तसेच, तुम्हालाही तडीपार आरोपी दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.

एका क्लिकवर गुन्हेगारांची कुंडली :

एका क्लिकवर गुन्हेगारांची सर्व कुंडली त्यातून उपलब्ध होत आहे. एकाच वेळी साडेसहा लाख गुन्हेगारांचे तपशील ही यंत्रणा उपलब्ध करून देत आहे.  छायाचित्रावरून सीसीटीव्हींनी कैद केलेल्या चित्रणावरूनही गुन्हेगारांची ओळख पटू शकेल, त्यांची इत्थंभूत माहिती पोलिसांना मिळू शकेल. महाराष्ट्र सायबरने पुढाकार घेत ही अद्ययावत प्रणाली विकसित केली. मुंबईतून याची सुरुवात करण्यात आली आहे.

अशाही घटना घडतात :

हद्दपार आरोपी बनला पोलिस गिरगावात कामानिमित्त आलेल्या एका व्यावसायिक तरुणाला पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करत लुबाडणाऱ्या पोलिस अभिलेखावरील हद्दपार आरोपीला डाॅ. दा.भ. मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अजयकुमार हरिजन (३०) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने पोलिस असल्याची बतावणी करत फसवणूक केली आहे.

पोलिसावर हल्ला :

हद्दपार आरोपीवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसावर हल्ला केल्याची घटना वांद्रेमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. आसिफ अब्दुल गफ्फार शेख ऊर्फ टेरेस (२२) असे अटक आरोपीचे नाव असून तो अभिलेखावरील आरोपी आहे. आसिफला जून महिन्यात दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले. त्याच्या विरोधात चोरीचे गुन्हे नोंद आहेत.  

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी