वेगावर नियंत्रणासाठी आणखी गतिरोधक? महापालिकेचा विचार : वाहतूक विभागाशी चर्चा
By जयंत होवाळ | Updated: October 6, 2025 10:12 IST2025-10-06T10:12:12+5:302025-10-06T10:12:21+5:30
कोस्टल रोडवरील वाहनांचा वाढता वेग आणि बोगद्यातील अपघात ही एक डोकेदुखीच झाली आहे. मागील आठवड्यात या रस्त्याच्या बोगद्यात एका वाहनाला आग लागल्याची घटना घडली होती.

वेगावर नियंत्रणासाठी आणखी गतिरोधक? महापालिकेचा विचार : वाहतूक विभागाशी चर्चा
- जयंत होवाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोस्टल रोडवरील वाढते अपघात रोखण्यासाठी ठिकठिकाणी विशिष्ट प्रकारचे गतिरोधक बसविण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिका विचार करत आहे. त्याकरिता वाहतूक विभागाबरोबर प्रशासनाची चर्चा सुरू आहे.
कोस्टल रोडवरील वाहनांचा वाढता वेग आणि बोगद्यातील अपघात ही एक डोकेदुखीच झाली आहे. मागील आठवड्यात या रस्त्याच्या बोगद्यात एका वाहनाला आग लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे हा रस्ता कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्यावरील बोगद्यामध्ये ६० किलोमीटर प्रति तास, रस्त्यावर ८० किलोमीटर आणि आंतर बदल असेल तिथे ४० किलोमीटर प्रति तास अशी वेगमर्यादा घातली आहे. मात्र, त्याचे उल्लंघन होताना दिसते. वाहनचालकांना पकडण्यासाठी वेग मर्यादा तपासणारे कॅमेरे कोस्टल रोडच्या उत्तर आणि दक्षिण बाजूस बसवले आहेत. कोस्टल रोडवर बेस्ट बससाठी राखीव असलेल्या मार्गिकेतही अन्य वाहने घुसखोरी करतात. अशा वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता असते.
कॅमेरे झूम करून शोधतात कारण
या रस्त्यावर एखादे वाहन अचानक थांबले, तर ते का थांबले तसेच अपघात घडला तर कॅमेऱ्यांद्वारे झूम करून तेथे नेमके काय घडले हे दिसते.
कोस्टल रोडवरील प्रवास सुरक्षित व्हावा, म्हणून महापालिका आणि वाहतूक पोलिस प्रयत्नशील आहेत. वाहनांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, यासाठी ठिकठिकाणी विशिष्ट प्रकारचे गतिरोधक बसवण्याचा विचार सुरू आहे. मात्र त्यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. या संदर्भात वाहतूक पोलिसांशी प्राथमिक चर्चा सुरू आहे. बोगद्यात अपघाताच्या घटना का घडल्या, याचाही अभ्यास सुरू आहे.
- मंतय्या स्वामी,
मुख्य अभियंता, कोस्टल रोड