Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’बाधितांमध्ये निम्म्याहून अधिक तरुण; वैद्यकीय शिक्षण विभागाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 06:16 IST

मृतांमध्ये वृद्धांचे प्रमाण चिंताजनक

मुंबई/औरंगाबाद : राज्यातील ‘कोरोना’ बाधितांची संख्या देशात सर्वाधिक झाली आहे. गंभीर बाब म्हणजे यामध्ये २० ते ५० वयोगटातील निम्म्याहून अधिक म्हणजेच १३५ रुग्णांचा समावेश आहे. बाधितांपैकी उपचारादरम्यान पन्नाशीपुढील आठ, तर तिशी अन् चाळिशीतील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

राज्यात २१-३० वयोगटामधील ४५ जण ‘कोरोना’बाधित आहेत. ३१-४० वयोगटामध्ये ४६ जण, तर ४१ ते ५० वयोगटात ४४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ५१ ते ६० वयोगटामध्ये २७ रुग्ण आहेत. ६१ ते ७० वयोगटात २४ जण आणि त्यापुढील वयोगटात सहा रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. १-१० वयोगटातील ७ बालकांना लागण झाली आहे. ११ ते २० वयोगटामध्ये १७ शाळकरी व महाविद्यालयीन युवक कोरोनाबाधित झाल्याचे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मंगळवारी (दि.३१) आलेल्या अहवालात म्हटले आहे.

या अहवालानुसार बाधितांमध्ये ३६ टक्के महिला व ६४ टक्के पुरुष आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, सांगली, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, रायगड, यवतमाळ, अहमदनगर येथे बाधित रुग्णसंख्येचे निदान झाले. त्यादृष्टीने मराठवाड्याचे चित्र दिलासादायक आहे. औरंगाबादेत आढळलेली एकमेव महिला रुग्ण बरी होऊन घरी परतली आहे. आजपर्यंत ४,७५१ रुग्णांची कोविड-१९ ची तपासणी झाली. त्यापैकी ९५ टक्के अहवाल निगेटिव्ह, तर पाच टक्के अहवाल पॉझिटिव्ह आले. त्याचप्रमाणे आजपर्यंत ३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 प्रवास न केलेल्यांचे बाधितांत वाढतेय प्रमाण

च्बाहेर देशातून प्रवास करून आलेले तीन रुग्ण ९ मार्चला पहिल्यांदा राज्यात बाधित आढळून आले. त्यानंतर परदेशात प्रवास न केलेल्या मात्र बाधित झालेल्यांची संख्या तुरळकपणे वाढत होती. च्२३ मार्चपासून या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. गेल्या तीन दिवसांत एकही प्रवासी बाधित आढळून आला नसला तरी प्रवासाचा पूर्वेतिहास नसलेल्यांचा कोरोना बाधितांत समावेश झाला आहे.

राज्यातील बाधित रुग्णांची संख्या वाढलेली आहे. कारण, मुंबई व्यापाराचे केंद्र असल्याने जगभरातून मुंबईत दररोज सुमारे १८ हजार लोक येतात. त्या तुलनेत आजच्या बाधितांची संख्या पाहिली, तर प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे नियंत्रणात आणण्यात यशस्वी झालो आहोत.-डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या