खराब जीवनशैलीमुळे निम्म्याहून अधिक आजार - राहीबाई पोपरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 07:07 IST2020-03-03T00:24:18+5:302020-03-03T07:07:01+5:30
रासायनिक खाते, फवारणी, कीटकनाशक यांच्यामुळे उत्पादन तर नक्कीच वाढले आहे. मात्र, आपण अन्नात विष तयार करायला लागलो आहोत.

खराब जीवनशैलीमुळे निम्म्याहून अधिक आजार - राहीबाई पोपरे
मुंबई : रासायनिक खाते, फवारणी, कीटकनाशक यांच्यामुळे उत्पादन तर नक्कीच वाढले आहे. मात्र, आपण अन्नात विष तयार करायला लागलो आहोत. तसेच आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी एवढ्या खराब झाल्यात की, त्यामुळेच निम्म्याहून अधिक आजार आपल्याला होत आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीचे महत्त्व आपल्याला कळायला हवे. आपण सगळ्यांनी आपल्या मुलांच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, असे शेतकरी आणि पर्यावरण रक्षक राहीबाई पोपरे म्हणाल्या.
वातावरण फाउंडेशन आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फोरम-एसबीएमचा विद्यार्थी विभाग यांनी विलेपार्ले येथील स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटतर्फे आयोजित ‘एक प्रयास’ या कार्यक्रमात राहीबाई पोपरे बोलत होत्या. हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांनीही या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, लहानपणी जे गाव मी बघितले होते, तेच पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. सुरुवातीला समोरची आव्हाने बघून घाबरायला झाले, पण जिद्द होती. गावातील लोक पाठीशी ठाम उभे राहिले, म्हणून गावात परिवर्तन घडवून आणणे शक्य झाले.