Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ९ हजारांहून अधिक शाळा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 02:31 IST

आठ महिन्यांनी वाजली घंटा; तीन लाख विद्यार्थ्यांची उपस्थिती

पुणे : कोरोनानंतर आठ महिने बंद असलेल्या राज्यातील शाळांची पहिली घंटा सोमवारी वाजली. पहिल्या दिवशी तब्बल ९ हजार १२७ शाळा सुरू झाल्या तर २ लाख ९९ हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ९४० शाळा सुरू झाल्या. दहा जिल्हांमध्ये शाळा बंद आहेत. 

ऑनलाईन शिक्षणाला कंटाळलेल्या आणि घरी बसून वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात शाळेत हजेरी लावली. त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. बहुतांश सर्वच शाळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यादृष्टीने आवश्यक काळजी घतल्याचे दिसून आले. मराठवाडा, विदर्भात प्रत्येकी एक हजार शाळा सुरू झाल्या. पश्चिम वऱ्हाडात विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरविली. पालकांची संमतीपत्रे मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ३२१ माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाले. सातारा जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीत ४५ टक्के शाळा सुरू झाल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२९ माध्यमिक शाळांचे टाळे उघडलेच नाही. राज्यात नववी ते बारावीपर्यंतच्या २५,८६६ शाळा आहेत.

कोरोनाचा संसर्ग होण्याची अधिक भीती नसलेल्या भागातील शाळा सुरू होत आहेत. कोरोना काळात सामाजिक व आर्थिक दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाऊन शाळाबाह्य होतील. - विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त

१,३५३ शिक्षक बाधितn पुण्यासह २५ जिल्ह्यांतील २,९९,१९३ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. राज्यात नववी ते बारावीपर्यंतच्या २५,८६६ शाळा असून त्यात ५९,२७,४५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. n या शाळांमधील शिक्षकांची संख्या २,७५,४७० तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या ९६ हजार ६६६ आहे. n १ लाख ४१ हजार ७२० शिक्षकांची कोरोना चाचणी झाली. १,३५३ शिक्षक आणि २९० शिक्षकेतर कर्मचारी बाधित आढळले.

 

टॅग्स :मुंबईशाळा